![]()
महाराष्ट्राच्या गौरवशाली मातीत सत्यशोधकी जलशांचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे ज्येष्ठ लोककलावंत शाहीर रामदास नाथाजी गुंड यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांनी कलगीतुऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रभर असंख्य कार्यक्रम करून लोककलेला एक वेगळे स्थान मिळवून दिले. त्यांच्या निधनावर मंत्री छगन भुजबळ, काँग्रेस विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. शाहीर रामदास नाथाजी गुंड यांचे गाव अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील काताळवेढे आहे. त्यांचा पुणे जिल्ह्यातील गावागावात मोठा संपर्क होता. ते गावोगावी फिरून महागाई, दरवाढ, आरक्षण, बैलगाडा बंदी, बालविवाह, स्त्रीभ्रूण हत्या, जागतिक युद्ध, कोरोना महामारी, व्यसनमुक्ती आदी विविध सामाजिक मुद्यांवर भाष्य केले. त्यांनी अनेक नवोदित कलाकार घडवले. त्यातून शाहिरी परंपरेला नवे बळ मिळाले. ते आपल्या कलगीतुरा फडासाठी ओळखले जायचे. चार वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणांचा भेद मांडणारा दुर्मिळ प्रकार त्यांनी आपल्या कलेतून जिवंत ठेवला. पण आता शाहिरी क्षेत्रातील हा तरबेज ‘गुंड’ कायमचा शांत झाल्याने डफ पोरका झाला. डफावरच्या थापीने समाजमन जागृत करणारा कलावंत हरपला – भुजबळ मंत्री छगन भुजबळ यांनी शाहीर गुंड यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या गौरवशाली मातीतील बुलंद आवाज आणि सत्यशोधकी जलशांचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे ज्येष्ठ लोककलावंत प्रबोधनकार शाहीर रामनाथ नाथाजी गुंड यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने डफावरच्या थापीने समाजमनाला जागृत ठेवणाऱ्या एका महान कलावंताचा अंत झाला आहे. शाहिरी ही केवळ मनोरंजन नसून ते समाज परिवर्तनाचे शस्त्र आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले. महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतिकारी विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांच्या रचनांमधून व्यक्त होणारा शेतकरी, कष्टकरी आणि बहुजन समाजाचा हुंकार कायमच प्रेरणादायी राहील. शाहीर रामनाथजींनी केवळ कलाच जोपासली नाही, तर नव्या पिढीला लोककलेचा वारसा देण्याचे महत्त्वाचे कार्य केले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वैचारिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने एक प्रबोधनाचा झंझावात शांत झाला असला तरी, त्यांनी दिलेला विचारांचा वारसा आपण सदैव पुढे नेऊया. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे ते म्हणालेत. गुंड यांचे निधन मन सुन्न करणारे – वडेट्टीवार काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही गुंड यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, डफावरची थाप आणि पहाडी आवाजाच्या जोरावर समाजातील अनिष्ट प्रथांविरुद्ध लढा देणारे ज्येष्ठ लोककलावंत शाहीर रामनाथजी गुंड यांच्या निधनाचे वृत्त मन सुन्न करणारे आहे. लोककलेच्या माध्यमातून समाजजागृतीचा एक धगधगता वारसा आज शांत झाला आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीची मोठी हानी झाली आहे. शाहिरी ही केवळ कला नसून ते परिवर्तनाचे एक प्रभावी माध्यम आहे, हे रामनाथजींनी आपल्या पहाडी आवाजातून आणि धारदार शब्दांतून वारंवार सिद्ध केले. महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांनी खेड्यापाड्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवले. कष्टकरी, शेतकरी आणि बहुजन समाजाच्या हितासाठी त्यांनी आयुष्यभर दिलेला वैचारिक लढा सदैव स्मरणात राहील. रामनाथजींचे जाणे ही कला क्षेत्रातील एक न भरून निघणारी पोकळी आहे. त्यांच्या जाण्याने प्रबोधनाचा एक तेजस्वी झंझावात थांबला असला, तरी त्यांनी रचलेल्या पोवाड्यांतून आणि गीतांतून त्यांचा विचार महाराष्ट्राच्या मातीत कायम जिवंत राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या कठीण प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, असे वडेट्टीवार म्हणाले.
Source link