![]()
पुणे शहर पोलिसांनी ‘ड्रग्जमुक्त भारत’ मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. शहरातील विविध २३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून जप्त करण्यात आलेले तब्बल ४५५ किलो ८४५ ग्रॅम अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. या मुद्देमालाची किंमत ४ कोटी ११ लाख ९१ हजार ७६५ रुपये आहे. रांजणगाव एमआयडीसी येथील एका कारखान्यात ही कायदेशीर विल्हेवाट लावण्यात आली. ‘ड्रग डिस्पोजल कमिटी’च्या परवानगीने आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही कारवाई पार पडली. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील १२३ अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यातील (एनडीपीएस) गुन्ह्यांमध्ये हा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. केंद्र सरकारच्या ‘ड्रग्जमुक्त भारत’ संकल्पनेच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थांमध्ये ४२५ किलो ४७२ ग्रॅम गांजा (किंमत ८५ लाख ९ हजार ४५६ रुपये), १ किलो १५७ ग्रॅम एमडी (२ कोटी ३१ लाख ४५ हजार ७२० रुपये), १२७ ग्रॅम ५०० मिलीग्रॅम मेथॅम्फेटामाइन (२५ लाख ५० हजार रुपये) आणि ६५ ग्रॅम ५०० मिलीग्रॅम हेरॉईन (२२ लाख ९२ हजार ५०० रुपये) यांचा समावेश होता. याशिवाय, २०० ग्रॅम ओजीकुश गांजा, १०० ग्रॅम ८७० मिलीग्रॅम चरस, ६५ ग्रॅम ८० मिलीग्रॅम हशिश ऑईल, २४ किलो ८४७ ग्रॅम अफू/दोडाचुरा, नायट्राझेपम व अल्प्राझोलमच्या गोळ्या, ब्राऊन शुगर, गर्द पावडर आणि गांजा मिश्रित पदार्थही नष्ट करण्यात आले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अंमली पदार्थविरोधी पथक-१ मधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, जीवन माने, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, अफरोज पठाण, पोलीस उपनिरीक्षक योगेश कोतकर यांच्यासह पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
Source link
पुण्यात 455 किलो अंमली पदार्थ नष्ट, 4.11 कोटींचा मुद्देमाल:'ड्रग्जमुक्त भारत' मोहिमेअंतर्गत 123 गुन्ह्यांतील मुद्देमालाची विल्हेवाट