![]()
महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आता मराठी भाषेचा डंका वाजणार आहे. १ मेपासून रिक्षा, टॅक्सी, ओला-उबर आणि ई-बाइक चालवणाऱ्या अमराठी चालकांना आता प्रवाशांशी मराठीतच संवाद साधावा लागणार आहे. विशेष म्हणजे ही भाषा शिकवण्यासाठी राज्यातील दिग्गज साहित्यिक आणि संस्थांनी पुढाकार घेतला आहे. लवकरच चालकांसाठी खास मराठी कार्यशाळा सुरू होणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. एकीकडे मराठी अस्मितेचा मुद्दा जोर धरत असताना, दुसरीकडे या निर्णयाला विरोधही सुरू झाला आहे. मराठी सक्तीविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. मनसेही आक्रमक झाली आहे. त्यामुळे मराठी भाषेवरून राजकारण तापल्याचे दिसून येत आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या बैठकीत मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेने अमराठी चालकांना व्यावहारिक मराठी शिकवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी ७२ शाखांमधून प्रत्यक्ष वर्ग आणि ऑनलाइन माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी चालकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अभिजात दर्जा मिळालेल्या मराठी भाषेबद्दल आत्मीयता निर्माण करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. अमित ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर रेल्वेने अधिसूचना बदलली रिक्षा-टॅक्सी वादाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे यांना मोठे यश मिळाले आहे. मध्य रेल्वेच्या भरती प्रक्रियेत आता मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. ठाकरेंच्या इशाऱ्याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने आपली अधिसूचना बदलली असून मराठी तरुणांसाठी रोजगाराची दारे अधिक सुकर केली आहेत. प्रताप सरनाईक यांच्या या भूमिकेमागे राजकीय गणिते असल्याची चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी “हिंदी ही आमची लाडकी बहीण आहे’ असे विधान केले होते, ज्यावरून त्यांच्यावर टीका झाली होती. आता मराठीचा मुद्दा आक्रमकपणे मांडून ते आपली प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, सदावर्ते यांनी सरनाईकांचे विरोधक भाजप आमदार नरेंद्र मेहतांची भेट घेतल्याने महायुतीमधील सुप्त संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या निर्णयाला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध दर्शवला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे. मीरा-भाईंदर येथे सदावर्ते आणि मनसे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने मोठा राडा झाला. पोलिसांनी अनेक मनसैनिकांना ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी बोलता आलंच पाहिजे. ज्या दिवशी हे लोक संपावर जातील, त्याच दिवशी मनसे त्यांना रस्त्यावर उतरून उत्तर देईल, असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे. चालकाच्या मराठी व्यवहारज्ञानाची पडताळणी : प्रताप सरनाईक महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यभर परवाना तपासणी मोहीम राबवली जाईल. या वेळी केवळ कागदपत्रांचीच नव्हे तर चालकाला मराठीचे व्यवहारज्ञान आहे की नाही याचीही पडताळणी केली जाईल. चालकांवर दडपण आणणे हा उद्देश नाही. त्यांच्यात मराठीबद्दल आत्मीयता निर्माण करणे हा आमचा प्रयत्न आहे, असे सरनाईक म्हणाले.
Source link
राजकारण तापले:राज्यामध्ये अमराठी रिक्षाचालकांना साहित्यिक देणार आता मराठीचे धडे, रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी अनिवार्य