![]()
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील पूजनीय संतांविषयी चुकीचे, आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोपावरून गुरुवारी (दि.२३) वारकरी संप्रदाय, सकल हिंदू समाजाने तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. सोयगाव नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात वारकरी संप्रदायातील ऋषितुल्य व्यक्तींचा अवमान झाल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम वारकरी बांधव, सकल हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचे सांगण्यात आले. लवांडे नेहमीच आक्षेपार्ह भाषा, वादग्रस्त विधाने करतो, असा आरोप करण्यात आला. समाजात जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणे, समाजात फूट पाडणे, हिंदूंच्या श्रद्धांचा अवमान करणे सातत्याने केल्याचेही निवेदनात म्हटले आहे. विकास लवांडे यांना तातडीने अटक करावी, कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. तहसील कार्यालयासमोर वारकरी संप्रदायाचे हभप पारस महाराज बनोटीकर, हभप जान्हवी सोनवणे महाराज यांनी आपल्या भाषणातून सदर वक्तव्याचा निषेध केला. यावेळी वारकरी संप्रदायाचे भक्त, हिंदू समाजातील मंगेश सोहनी, दिलीप मचे, मयूर मनगटे, राहुल राठोड आदींची उपस्थिती होती.
Source link
संतांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, सोयगावला मोर्चा:नायब तहसीलदारांना निवेदन, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी