![]()
राज्यात यंदा दुष्काळाचे मोठे संकट असून, संकटग्रस्तांना मदत करण्यासाठी पुणेकरांनी पुढाकार घ्यावा. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून दुष्काळ निवारणासाठी भरीव निधी उभारणे गरजेचे आहे. सामाजिक जाणिवेतून प्रत्येकाने या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले. दुष्काळ निवारणासाठी त्यांनी १० लाख रुपये देण्याची घोषणा केली. युवासेना पुणे शहराध्यक्ष हेमंत बागुल यांनी पाच लाख, तर विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी एक लाख रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले. ३२ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे उद्घाटन रविवारी (११ ऑक्टोबर) गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार, डॉ. नीलम गोऱ्हे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, शिवसेना महानगरप्रमुख नाना भानगिरे, माजी आमदार रवींद्र धंगेकर, अभिनेत्री श्वेता शिंदे आणि महोत्सवाचे आयोजक आबा बागुल यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. मराठी भाषेच्या संवर्धनावर भर सामंत म्हणाले, आबा बागुल यांनी दूरदृष्टीतून ई-लर्निंग स्कूल सुरू केले असून, वरिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याची त्यांची योजनाही महत्त्वाची आहे. पुणे नवरात्रौ महोत्सवातून बोलीभाषा आणि लोककलांचे जतन केले जात आहे. मराठी भाषेच्या अर्थसंकल्पासाठीची तरतूद पूर्वीच्या ५० कोटी रुपयांवरून आता ३६० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मराठी भाषेचे संवर्धन, जतन आणि प्रसार होणे आवश्यक आहे. त्यासाठी लंडनमध्ये जागतिक मराठी भाषा केंद्र सुरू करण्याचा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्यक्रम पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन आयोजित व्हावेत आणि राज्यकर्त्यांनीही त्यांना उपस्थित राहावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. पुढील वर्षापासून महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या नावाने पुरस्कार सुरू करण्याची सूचनाही सामंत यांनी केली. पाच मान्यवरांचा जीवनगौरव महोत्सवात क्रीडा क्षेत्रासाठी डॉ. संजय दुधाणे, वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. ऋतुपर्ण शिंदे, सामाजिक क्षेत्रासाठी डॉ. विजय फळणीकर, सांस्कृतिक क्षेत्रासाठी निकिता मोघे आणि लोककलेसाठी वैशाली समसापूरकर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुढील वर्षी एक लाख नागरिकांना हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचविण्यासाठी आवश्यक असलेले सीपीआर प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवावे, अशी सूचना डॉ. शिंदे यांनी केली. प्रास्ताविकात आबा बागुल यांनी कलाकारांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ३२ वर्षांपासून महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. उद्घाटन सोहळ्यात भरतनाट्यम, खंडोबा-बानू विवाह सोहळा आणि देवीवरील गीत-नृत्यांचे सादरीकरण झाले. कलाकारांच्या नृत्याविष्काराला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. यावेळी देवीची आरती करण्यात आली आणि नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
Source link
दुष्काळ निवारणासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांतून निधी उभारावा:पुणे नवरात्रौ महोत्सवाचे उद्घाटन, उदय सामंत यांनी 10 लाखांची मदत जाहीर केली