महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध मागण्यांसाठी पुण्यात गेल्या 11 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला रविवारी महत्त्वाचे वळण मिळाले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद
.
‘मी भारती विद्यापीठात शिकलो नाही’; शिवेंद्रराजेंच्या विधानाची चर्चा
आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या शिक्षणाचा उल्लेख केला. ‘माझा अभ्यास कमी आहे. मी भारती विद्यापीठात शिकलो नाही, गरीबासारखा साताऱ्यात शिकलो. त्यामुळे माझ्यावर काही टीका करू नका,’ अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या विधानाचा रोख नेमका कोणाकडे होता, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या वक्तव्याकडे विश्वजित कदम यांना उद्देशून केलेली अप्रत्यक्ष टिप्पणी म्हणून पाहिले जात आहे.
दरम्यान, आंदोलनस्थळी शिवेंद्रराजे उपस्थित असताना काही विद्यार्थिनींनी घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी आंदोलकांना कायद्याच्या चौकटीत राहून मार्ग काढण्याचे आवाहन केले. ‘आपण कायदा मानणारी माणसे आहोत. काही घटनात्मक बाबी असतात, त्या पाळाव्या लागतात. काही तांत्रिक प्रक्रियाही पूर्ण कराव्या लागतात. मात्र, आपला अंतिम हेतू नक्की साध्य होईल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तुकाराम मुंढे MPSC चे सचिव म्हणून काम पाहणार
MPSC आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवेंद्रराजे भोसले यांनी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून, तुकाराम मुंढे हे यापुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव म्हणून काम पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या घोषणेमुळे आंदोलनातील प्रमुख मागण्यांबाबत सरकारने पुढाकार घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शिवेंद्रराजे यांनी सरकारकडून मान्य करण्यात आलेल्या मागण्यांचा मसुदा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडे सुपूर्द केला. या मसुद्यातील मुद्द्यांवर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. सरकारने घेतलेल्या भूमिकेनंतर आंदोलन मागे घेण्याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना विनंती केली.
विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी कायम
MPSC च्या कारभारासंदर्भात विविध मागण्या पुढे करत विद्यार्थी गेल्या 11 दिवसांपासून पुण्यात आंदोलन करत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना पदावरून हटवावे, त्यांचा राजीनामा घ्यावा, ही आंदोलक विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. आयोगाच्या कामकाजातील प्रश्न आणि भरती प्रक्रियेशी संबंधित मुद्द्यांवर विद्यार्थ्यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व आमदार रोहित पवार करत आहेत. विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत त्यांनी सरकारकडे या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे. आंदोलनाला अनेक दिवस उलटूनही प्रश्न सुटत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी असल्याचे आंदोलनस्थळावरील वातावरणातून दिसून येत आहे.
सरकारची समजूत काढण्याची भूमिका; आंदोलन मागे घेण्याचे आवाहन
विद्यार्थ्यांचे आंदोलन संपवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवेंद्रराजे भोसले यांनी रोहित पवार आणि आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे सांगून त्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. घटनात्मक प्रक्रिया आणि कायदेशीर बाबींचे पालन करूनच मागण्यांवर निर्णय घेता येईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
मात्र, सरकारने काही मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगितले असले, तरी आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर काय निर्णय होणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे सचिवपदाबाबतची घोषणा आणि सरकारकडून देण्यात आलेला मागण्यांचा मसुदा यानंतर आंदोलन मागे घेतले जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा…
MPSC आंदोलनात मोठी घडामोड! तुकाराम मुंढे सचिवपदी:सरकारचा मागण्यांबाबत सकारात्मक पवित्रा; विवेक भीमनवारांच्या राजीनाम्यासाठी रोहित पवार आग्रही

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध मागण्यांसाठी गेल्या 11 दिवसांपासून पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असून, धडाडीचे अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांच्याकडे एमपीएससीच्या सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची समजूत काढण्यासाठी शिवेंद्रराजे यांनी आंदोलकांची तसेच आमदार रोहित पवार यांची भेट घेतली. यावेळी सरकारने मान्य केलेल्या मागण्यांचा मसुदाही त्यांनी रोहित पवार यांच्याकडे सुपूर्त केला. सविस्तर वाचा…