![]()
शहरातील आठवडे बाजार हा नागरिकांसाठी आहे की मोकाट जनावरांसाठी, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. बुधवारी भरलेल्या आठवडे बाजारात मोकाट जनावरांच्या झुंजीत बाजारासाठी आलेल्या महिलेसह तिच्या कडेवर असलेले चिमुकले बाळ गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजारात माणसांपेक्षा मोकाट जनावरांचीच संख्या अधिक असल्याचे चित्र दिसत आहे. भाजीपाला विक्रीसाठी जीवाची बाजी लावून आलेल्या शेतकऱ्यांचा शेतमाल या जनावरांकडून फस्त केला जातो. विरोध केला तर जनावरे थेट हल्ला करतात ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. रोजीरोटीचा प्रश्न असताना शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होत असतानाही पालिका मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. फक्त आठवडे बाजारच नव्हे, तर शहर आणि उपनगरातही ही मोकाट जनावरे रोजच दहशत माजवत आहेत. मागील आठवड्यात वामनभाऊनगर परिसरात अशाच प्रकारात एका लहान मुलीचा जीव थोडक्यात वाचला होता. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पालिका प्रशासनापर्यंत पोहचवले तरीही प्रशासनाला जाग आलेली नाही. शहरालगत राहणारे काही शेतकरी स्वतःची जनावरे शहरात मोकाट सोडत असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. या जनावरांची संख्या आता हजारोंच्या घरात गेली असून नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः त्रस्त झाले आहे. स्व. वसंतराव नाईक चौक ते हिंद वसतीगृह माणिकदौंडी चौक दरम्यान रस्त्यावर बाजार भरत असल्याने संपूर्ण रस्ता बंद होतो. रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. या मार्गावर लहान मुलांचे हॉस्पिटल व शाळा असल्याने रुग्ण, विद्यार्थी आणि नागरिकांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागतो. आपत्कालीन सेवांनाही अडथळा निर्माण होत आहे. पालिकेची ही निष्क्रियता आता नागरिकांच्या जीवावर उठली असून आणखी किती अपघात, किती जखमी आणि किती निष्पाप जीव धोक्यात घातल्यानंतर प्रशासन जागे होणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. पालिकेकडून करवसुली सुविधांचा मात्र दुष्काळ आठवडे बाजारात पालिका शेतकरी व व्यापाऱ्यांकडून एका दिवसाचे पन्नास रुपये कर वसूल करते. मात्र त्याबदल्यात कोणतीही मूलभूत सुविधा दिली जात नाही. ना सुरक्षा, ना स्वच्छता, ना नियोजन. हा कर वसूल करून नेमका कोणाचा फायदा केला जातो असा थेट सवाल आता उपस्थित होत आहे.
Source link
मोकाट जनावरांमुळे पाथर्डी बाजारामध्ये नागरिकांना त्रास:शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा करावा लागतोय सामना