Headlines

दहशतवादाशी लढताना पोलिसांचे बलिदाने जास्त:तरीही आम्हीच उपेक्षित, टीकेचे धनी ठरतो पण देशासाठी प्राणही देतो!- आयजी सुनील फुलारी




कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पोलिस दलाची व्यथा मांडली आहे. दहशतवादाचा मुकाबला करताना देशातील पोलिस दलाची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे, असे ते म्हणाले. तरीही पोलिस दल उपेक्षित राहिल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या 75 वर्षांतील आकडेवारीनुसार, पंजाब, जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्यांमध्ये सशस्त्र दलांपेक्षा पोलिसांची संख्या अधिक आहे. असे असूनही, पोलिस हेच टीकेचे मुख्य लक्ष्य ठरतात, त्यामुळे ते ‘अनसंग हिरो’ आहेत, असे फुलारी यांनी स्पष्ट केले. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेतर्फे आयोजित ‘अनसंग एव्हरीडे हीरोज’ पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’तर्फे राजेय शास्तारे, जयंत भोळे, स्वामी माधवानंद, पांडुरंग शेळके, माणिक भोंग आणि राजश्री राणे उपस्थित होते. पुरस्कार तीन विभागांत देण्यात आले. क्रीडा क्षेत्रातील सलोनी मोरे, जान्हवी कानिटकर, डॉ. स्मिता झांझुर्णे आणि अनुष्का कांबळे यांचा गौरव करण्यात आला. ‘व्यवसाय व सामाजिक’ क्षेत्रांत वासंती देव, डॉ. किमया शहा, प्रमोद चौघुले, राहुल जवळकर, शिवाजी नलवडे, सोहम कुलकर्णी आणि भरत व सुरेखा भोर यांना सन्मानित करण्यात आले. तर ‘युवा नेतृत्व’ देणाऱ्या सायली मुळे-दामले, योगेश गुरव, श्रीराम नांगरे पाटील, अयान मंत्री आणि अभिजित पोखरणीकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी जयंत भोळे यांनी संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, भारतातील सात लाख गावांमध्ये ‘प्रोजेक्ट भारत’ राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत रोजगार निर्मिती, जलसंधारण, शिक्षण, आरोग्य सेवा आणि कौशल्य विकास या क्षेत्रांत उपक्रम हाती घेतले जातील. ‘सुशिक्षित, संरक्षित, स्वस्थ आणि समृद्ध भारत घडविणे’ हे श्री श्री रविशंकर यांचे ध्येय साध्य करण्यासाठी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ परिवार प्रयत्नशील असल्याचे भोळे यांनी नमूद केले. प्रास्ताविकात राजेय शास्तारे यांनी गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या सत्तरावा वाढदिवस आणि ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ची 45 वर्षे पूर्ण होत असल्याचे सांगितले. गुरुदेव जगातील सर्व समुदायांसाठी अहोरात्र काम करत असतात, असे ते म्हणाले. गुरुदेवांनीच भारतातील 806 जिल्ह्यांतील निवडक क्षेत्रांतील अशा व्यक्तींचा सन्मान करण्याची सूचना केली होती, ज्या कोणत्याही मोबदल्याविना समाजासाठी काम करत आहेत. त्यातूनच या पुरस्काराची कल्पना साकार झाली, असे शास्तारे यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *