Headlines

विद्यार्थिनींनी पदवीसोबतच कौशल्य आत्मसात करावे:कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांचे प्रतिपादन




अमरावती येथील नूतन विदर्भ शिक्षण मंडळाच्या महिला महाविद्यालयाचा पदवी वितरण समारंभ नुकताच पार पडला. यावेळी कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी विद्यार्थिनींना पदवीसोबतच कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले. सध्याच्या धकाधकीच्या काळात केवळ शिक्षणाच्या आधारे नोकरी मिळवणे कठीण झाल्याचे त्यांनी नमूद केले. या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. असनारे उपस्थित होते. नूतन विदर्भ शिक्षण मंडळाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष डॉ. सुभाष कसबेकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. डॉ. अविनाश असनारे यांनी गुणवत्ताप्राप्त विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. मुलींवर सासर आणि माहेर अशा दोन्ही कुळांची जबाबदारी असते, तसेच त्यांना पुढची पिढी घडवायची असते, त्यामुळे समाजात वावरताना या जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. असनारे यांनी महाविद्यालयाशी आपला जुना ऋणानुबंध असल्याचे सांगत शैक्षणिक परंपरेचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. सुभाष कसबेकर यांनीही सर्व विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अरुणा वाडेकर यांनी पदविका प्राप्त करणाऱ्या सर्व विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. प्रा. मधुरा ठाकरे यांनी दीक्षांत संदेशाचे वाचन केले. विद्यापीठ गीत व महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला, त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाच्या विविध शाखांमधील स्नातक व पदव्युत्तर विभागातील गुणानुक्रमे पहिल्या तीन विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते पदवी व सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शर्मिला देशमुख यांनी केले, तर प्रा. डॉ. जयश्री वैष्णव यांनी आभार मानले. कोमल ढोके व श्रावणी भडके या विद्यार्थिनींच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *