![]()
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी केपीआयटी टेक्नोलॉजीचे अध्यक्ष तथा निष्णाता सीए डॉक्टर एस बी (रवी) पंडित यांचे आज पहाटे 5 च्या सुमारास पुणे येथे निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. त्यांच्या रुपाने केवळ एका यशस्वी उद्योगपती किंवा सीएचा काळाच्या पडद्याआड गेला नाही, तर दूरदृष्टी, नेतृत्व, नवोन्मेष व मूल्याधिष्ठित कार्यपद्धती यांचा एक प्रेरणादायी अध्याय संपुष्टात आल्याची भावना व्यक्त होत आहे. केपीआयटी ही माहिती तंत्रज्ञान व शाश्वत प्रगतीला चालना देणारी एक आघाडीची भारतीय कंपनी आहे. रवी पंडित यांनी गेल्या 3 दशकांत जागतिक दर्जाचे नावीन्य व सखोल सामाजिक उद्देश यांचा संगम साधणाऱ्या संस्थांची उभारणी केली आणि त्यांचे नेतृत्व केले. रवी पंडित केपीआयटीचे सहसंस्थापक व अध्यक्ष होते. ही कंपनी जागतिक सॉफ्टवेअर – डिफाइन्ड मोबिलिटीमधील एक आघाडीची कंपनी आहे. ही कंपनी ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग सोल्यूशन्सवर लक्ष केंद्रित करत जगभरातील 15 देशांत कार्यरत आहे. रवी पंडित यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. डॉक्टर रवी पंडित हे कीर्तने अँड पंडित चार्टर्ड अकाउंट्ंट्स (केपीसीए) चेही अध्यक्ष होते. केपीसीए ही 15 देशांत कार्यरत असणारी व 1200 हून अधिक तज्ज्ञांसह कार्य करणारी भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक सेवा कंपन्यांपैकी एक आहे. सी व्ही चितळे अँड कंपनीचे सीए चंद्रशेखर चितळे यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. एक प्रेरणादायी अध्याय संपुष्टात चंद्रशेखर चितळे म्हणाले, सी ए रवी पंडित यांच्या निधनामुळे केवळ एक यशस्वी उद्योगपती किंवा चार्टर्ड अकाउंटंट काळाच्या पडद्याआड गेला नाही, तर दूरदृष्टी, नेतृत्व, नवोन्मेष व मूल्याधिष्ठित कार्यपद्धती यांचा एक प्रेरणादायी अध्याय संपुष्टात आला आहे. त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले की, चार्टर्ड अकाउंटंट हा केवळ आर्थिक सल्लागार नसून, उद्योग, तंत्रज्ञान व समाज जीवनाला दिशा देणारा परिवर्तनकर्ता देखील असू शकतो. माझा त्यांच्याशी अनेक वर्षांचा निकटचा संबंध होता. त्यांच्या सहवासातून विचारांची व्यापकता, शिस्त, कार्यनिष्ठा व सकारात्मक दृष्टिकोन शिकण्याची संधी मिळाली. ते नेहमी उत्साही, तंरुरुस्त व प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून सर्वांच्या स्मरणात राहतील. चौफेर मार्गक्रमण करणारे नेतृत्व हरवले रवी पंडित यांनी भारताचा नागरी व शाश्वततेचा अजेंडा घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि जनवाणी यासारख्या संस्थांची सहस्थापना करून त्यांना मार्गदर्शन केले. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स येथील सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटला पाठिंबा देऊन धोरण संशोधनाला बळकटी दिली. तसेच ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष म्हणून नेतृत्व विकासालाही चालना दिली. रवी पंडित यांनी वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट, इंडिया व आगा खान रुरल सपोर्ट प्रोग्राम, इंडिया या संस्थांचे संचालक मंडळाचे सदस्य म्हणून राष्ट्रीय पर्यावरण व ग्रामीण विकासाच्या प्राधान्यक्रमांवर प्रभाव टाकला. त्यांनी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्षपदी भूषवले होते.
Source link
KPIT चे अध्यक्ष रवी पंडित यांचे निधन:वयाच्या 75 वर्षी घेतला अखेरचा श्वास; नवोन्मेष, मूल्याधिष्ठित कार्यपद्धतीचा अध्याय संपुष्टात