![]()
कोवळ्या कळ्यांमध्ये भविष्यातील ज्ञानेश्वर, शिवाजी महाराजांसारखे विचारवंत व महापुरुष दडलेले आहेत. आज समाजातील परिस्थिती ढासळत आहे. तरुण पिढी भरकटत आहे. अशा वेळी मुलांना योग्य संस्कार मिळण्यासाठी बालसंस्कार शिबिरांची आवश्यकता आहे. शिबिरातून चांगले संस्कार व विचार ग्रहण करा. आपले जीवन उज्ज्वल करा. असे मोलाचे मार्गदर्शन बाबाराव पाटील यांनी केले. येथील जिल्हा परिषद शाळेत श्री गुरुदेव सेवा मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री गुरुदेव सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिरास उत्साहात प्रारंभ झाला. शिबिरात सहभागी विद्यार्थी शिस्तबद्ध वातावरणात आध्यात्मिक व सुसंस्कारमूल्यांचे शिक्षण घेत आहेत. ग्रामस्थांकडून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. शिबिराचे उद्घाटन १२ मे रोजी सायंकाळी ७ वाजता बाबाराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून उद्घाटन सोहळा संपन्न झाला. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीच्या प्रशासक सपना वाकोडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून शिवदास महाराज गाडेकर, माणिकराव इंगळे, अजित सेंगर, वसंतराव वाघमारे, शेलोटकर गुरुजी, अंकुश मानकर, सागर ढगे, अफसर खाँ, बिस्मिल्ला खाँ तसेच माजी मुख्याध्यापक यवतकार उपस्थित होते. बालसंस्कार शिबिर हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित केला जाणारा उपक्रम आहे. यात मुलांना नैतिक मूल्ये, शिस्त, अध्यात्म, देशभक्ती, संस्कारांचे धडे दिले जातात. अशा शिबिरांमधून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. सामाजिक बांधिलकी वाढते. चांगल्या सवयी लागतात. भजन, प्रार्थना, योग, व्यायाम, लाठी-काठी, संगीत प्रशिक्षण यांसह विविध उपक्रमांद्वारे मुलांचा शारीरिक व मानसिक विकास घडवला जातो. असे मार्गदर्शन इतर मान्यवरांनी केले. शिबिरातील विद्यार्थ्यांसाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने सकाळ-दुपार अल्पोपहार, दूध तसेच सकाळ-संध्याकाळ अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित सेंगर यांनी केले. प्रास्ताविक माणिकराव इंगळे गुरुजी यांनी केले. आभार प्रदर्शन श्रीकांत यवतकार गुरुजी यांनी केले. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला वर्ग, युवक व शिबिरार्थी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थी घेताहेत आध्यात्मिक व सुसंस्कारमूल्यांचे धडे शिबिरात शेकडो विद्यार्थ्यांना तबला, हार्मोनियम, टाळ, लाठी-काठी, भजन आदींचे प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच अध्यात्म, देशभक्ती, मातृ-पितृ भक्ती, व्यसनमुक्ती आणि चारित्र्य संवर्धन यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन केले जात आहे. अभिजित इंगळे, इंगळे गुरुजी, शेलोटकर गुरुजी व अजित सेंगर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना दैनंदिन प्रशिक्षण दिले जात आहे.
Source link
शिबिरातून चांगले संस्कार, विचार ग्रहण करावेत- बाबाराव पाटील:दानापूर येथे श्री गुरुदेव सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिरास प्रारंभ