Headlines

अब्दुलच्या वडिलांची हत्या झाली:पण तो शाळा सुधारण्यासाठी लढत आहे; हिंगोलीत अभिजीत दिपके झाले भावुक




गेल्या काही काळापासून शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून रान उठवणारे ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके आज हिंगोली जिल्ह्यातील लिंबाळा मक्ता या गावात दाखल झाले. या गावात जाऊन त्यांनी स्थानिक शाळेची प्रत्यक्ष पाहणी केली आणि शिक्षकांच्या अनियमिततेवर ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी बोलताना, अब्दुल नावाच्या एका मुलाचा संघर्ष सांगताना अभिजीत दिपके अत्यंत भावुक झालेले पाहायला मिळाले. लोकांना राजकारण नको, समस्या सोडवायच्या आहेत “काही शिक्षक वेळेच्या आधी शाळेतून जातात आणि उशिरा येतात, त्यांच्यावर वचक बसवण्यासाठी काय कारवाई करणार?” असा प्रश्न दिपके यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, “आम्हाला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. याचे कारण असे की, लोकांना आता राजकारण नकोय, त्यांना त्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत आणि त्यासाठी ते आमच्यासोबत लढत आहेत. काही लोक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते म्हणतात की आम्हाला इलेक्शन लढायचंय, आम्ही उद्या जाऊन विकले जाऊ आणि ‘पन्नास खोके एकदम ओक्के’ बोलू. पण असे काहीही नाही. आम्ही शिक्षणाचे आणि बेरोजगारीचे मुद्दे उचलत आहोत. राजकारणात न उतरताही आम्ही या दोन महिन्यांच्या काळात खूप काही करून दाखवले आहे.” अब्दुलच्या हिमतीचे कौतुक करताना दिपकेंचे डोळे पाणावले शिक्षणाच्या मुद्द्यावर काम करत असताना आलेल्या एका हृदयस्पर्शी अनुभवाबद्दल बोलताना अभिजीत दिपके भावुक झाले. त्यांनी नुकतीच अब्दुल नावाच्या मुलाची भेट घेतली, ज्याच्या वडिलांची हत्या झाली आहे. “काल मी अब्दुलकडे गेलो होतो. मी त्याला विचारलं, कसा आहेस? आई कशी आहे? काही लागलं तर मला सांग. त्यावर तो मला म्हणाला, ‘दादा, माझे वडील गेलेत, पण आपण शाळा सुधारण्यावर जे काम सुरू केलं आहे, ते थांबवायचे नाही. माझे वडील आज हयात नाहीत, पण ज्या गोष्टीसाठी त्यांचा जीव गेला, त्यांची हत्या झाली, त्यांचा तो मृत्यू व्यर्थ नाही गेला पाहिजे. आपण शाळांवर काम करत राहू. जोपर्यंत शाळा ठीक होत नाहीत, तोपर्यंत आपण आणखी जोराने लढायचे आहे.'” दिपकेंचे अश्रू अनावर हे सांगताना दिपके यांचे डोळे पाणावले. “जेव्हा मी अब्दुलला फोन केला, तेव्हा त्याचे ते बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. पण तो मला म्हणाला, ‘दादा रडू नको. आपल्याला आणि माझ्या वडिलांनाही शाळा नीट करायच्या होत्या.’ जिथे मी माझी हिंमत हरलो होतो, तिथे ज्या तरुणाचे वडील गेलेत, तो मला हिंमत देत होता.” ते आपल्याला हिंदू-मुस्लिममध्ये विभागतात अब्दुलच्या या देशभक्तीचे आणि समाजप्रेमाचे कौतुक करताना दिपके यांनी राजकीय नेत्यांवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. “या मुलाची मानसिकता बघा, त्याचे देशावरचे आणि लोकांवरचे प्रेम बघा. स्वतःचे वडील गमावूनही तो समाज सुधारण्याची भाषा करत आहे. आणि इकडे काही राजकीय लोक फक्त आपल्याला हिंदू-मुस्लिममध्ये विभागण्याचे काम करत आहेत,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया अभिजीत दिपके यांनी व्यक्त केली. शाळांची पाहणी आता आंदोलनाचा पुढचा टप्पा अभिजीत दिपके यांची लिंबाळा मक्ता येथील भेट ही त्यांच्या सुरू असलेल्या ‘स्कूल ठीक करो’ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे. स्वातंत्र्यदिनाच्या आसपास सरकारी शाळांच्या स्थितीचा प्रश्न त्यांनी पुन्हा ऐरणीवर आणला असून, गावागावातील शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक समस्या समोर आणण्यावर भर दिला जात आहे. अलीकडे हिंगोलीसह महाराष्ट्रातील विविध भागांत त्यांच्या शैक्षणिक आंदोलनाला पाठिंबा मिळाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता शाळांमधील शिक्षकांची उपस्थिती, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा, पायाभूत सोयी, शिक्षणाचा दर्जा आणि ग्रामीण भागातील बेरोजगारी या मुद्द्यांवर दिपके पुढील काळात अधिक आक्रमक भूमिका घेणार का, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिक्षकांनी वेळेवर शाळेत उपस्थित राहणे आणि विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण मिळणे ही प्रशासनाची मूलभूत जबाबदारी आहे. त्यामुळे लिंबाळा मक्ता येथील तक्रारींबाबत स्थानिक शिक्षण विभागाकडून नेमकी काय दखल घेतली जाते, याबाबतही उत्सुकता आहे. हेही वाचा… देवेंद्र फडणवीसांना राष्ट्र साद घालतंय- संजय राऊत:म्हणाले- दिल्लीचं कॅबिनेट कमकुवत, मोदींना फडणवीसांची गरज, ते महाराष्ट्रातील काम आवरतील अन् दिल्लीत जातील! देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्र साद घालत आहे. कारण दिल्लीमधील जे कॅबिनेट आहे ते अत्यंत कमकुवत आहे. जंतरमंतरवरील आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तम कॅबिनेट तयार करायचे आहे, त्यासाठी त्यांना देवेंद्र फडणवीस यांची गरज आहे, असे ते सहकाऱ्यांना सांगत आहे. देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा काल त्यांनी हेच सांगितले असणार,फडणवीस इकडचे काम आवरतील आणि दिल्लीमध्ये जातील, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. येथे वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *