![]()
अमरावती जिल्ह्यात मान्सूनने दमदार हजेरी लावून सरासरी गाठली असली तरी, गेल्या चार दिवसांत पावसाचे प्रमाण पुन्हा सरासरीच्या ७६.६ टक्क्यांवर घसरले आहे. मान्सूनच्या या खंडामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, जलसाठे, पेरणी आणि स्थानिक व्यापारावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.चार दिवसांपूर्वी जिल्ह्याचा पाऊस सरासरीच्या ९० टक्क्यांवर पोहोचला होता. मात्र, त्यानंतरच्या खंडामुळे तो सुमारे १५ टक्क्यांनी घटला आहे. पावसाने सरासरी गाठल्याने धरणांमधील पाणीपातळी वाढण्याची आशा होती, परंतु आता जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांपैकी तीन प्रकल्पांमधील जलसाठा घटला आहे. उन्हाचा चटका वाढल्याने पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असून, आगामी काळात पाऊस न झाल्यास पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ शकते. मान्सूनच्या सुरुवातीला दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी उत्साहाने पेरण्या केल्या होत्या. मात्र, आता पिकांच्या वाढीच्या काळातच पावसाने खंड दिल्याने कोवळी पिके कोमेजू लागली आहेत. जमिनीत पुरेशी ओल नसल्याने बियाणे अंकुरण्यात अडचणी येत आहेत. हा खंड असाच कायम राहिल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे आर्थिक संकट ओढवू शकते. कृषी क्षेत्रातील या अनिश्चिततेचा थेट परिणाम बाजारपेठेवर होत आहे. शेतीचे भवितव्य अंधातरी असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला खीळ बसली आहे. यामुळे कापड, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर दैनंदिन व्यापारातील उलाढाल मंदावली आहे. शेतकरी वर्गाकडून मागणी घटल्याने कृषी व्यावसायिक आणि इतर उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आकडेवारीनुसार, ८ जुलै रोजी जिल्ह्याने सरासरीच्या ९० टक्क्यांपर्यंत पाऊस नोंदवला होता. त्यानंतरच्या दिवसांत तो अनुक्रमे ८८.६, ८५.२, ८२, ७९.३ असा घसरत आज ७६.६ टक्क्यांवर आला आहे. पुढील आठवडाभर दमदार पावसाची शक्यता नसल्याने ही घसरण आणखी वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांपैकी शहानूर, सपन आणि बोर्डीनाला या तीन प्रकल्पांमधील जलसाठा घटला आहे. गतवर्षी याच तारखेला चंद्रभागा प्रकल्पाचा जलसाठा ३९.७३ टक्के होता, जो यावर्षी ३३.४१ टक्क्यांवर थांबला आहे. सपन प्रकल्पाचा जलसाठा गतवर्षी ६८.१९ टक्के होता, तो यावर्षी ४१.१७ टक्क्यांवर आहे. बोर्डीनाला प्रकल्पाचा जलसाठा गतवर्षीच्या तुलनेत ०.३० टक्क्यांनी कमी झाला आहे.
Source link
अमरावतीत पाऊस सरासरीवरून 76 टक्क्यांवर घसरला:चार दिवसांत मान्सूनचा खंड; जलसाठे, पेरणी आणि व्यापाराला फटका