![]()
मेळघाटातील शिक्षण, आरोग्य, रोजगार, रस्ते आणि कुपोषण यांसारख्या गंभीर व प्रलंबित समस्यांवर मात करण्यासाठी ‘खोज’ संस्थेच्या नेतृत्वात शेकडो आदिवासी महिला व पुरुषांनी सोमवारी, १३ जुलै रोजी जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाने मेळघाटातील मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले असून, दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा करत या समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे मान्य केले आहे. भेट देणाऱ्या आदिवासी बांधवांनी मेळघाटातील अत्यंत संवेदनशील आणि पायाभूत प्रश्नांची मांडणी प्रशासनासमोर केली. मेळघाटातील बालकांचे कुपोषण आणि माता मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी दुर्गम भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पुरेसे डॉक्टर आणि औषधोपचार उपलब्ध करून देण्यावर भर दिला गेला. याशिवाय, आदिवासी पाड्यांवरील शाळांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. शिक्षकांची रिक्त पदे आणि विद्यार्थ्यांची होणारी गळती रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणीही यावेळी केली गेली. स्थानिक पातळीवर हाताला काम न मिळाल्यामुळे आदिवासींना स्थलांतर करावे लागते. त्यामुळे ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने’अंतर्गत (मनरेगा) गावांतच हक्काचा रोजगार वेळेवर उपलब्ध करून देण्याची मागणीसुद्धा प्रतिनिधीमंडळाने मांडली. पावसाळ्यात अनेक गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे दुर्गम भागातील रस्ते आणि पुलांची कामे तातडीने पूर्ण करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. आदिवासी महिला आणि पुरुषांनी मांडलेली व्यथा ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद सीईओ यांनी या मागण्यांवर अत्यंत सकारात्मकता दाखवली. मेळघाटातील विकासकामांना आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांना आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे त्यांनी सांगितले. शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराशी संबंधित प्रश्नांवर संबंधित विभागांची तातडीने बैठक घेऊन धोरणात्मक पावले उचलली जातील. तसेच कुपोषण निर्मूलनासाठी स्थानिक पातळीवर विशेष मोहिमा राबविण्यात येतील, असे दोन्ही अधिकारी म्हणाल्याचे प्रतिनिधीमंडळाचे नेते ॲड. बंड्या साने यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर आता या योजनांची आणि निर्णयांची जमिनीवर कितपत अंमलबजावणी होते, याकडे संपूर्ण मेळघाटवासीयांचे लक्ष लागले आहे. जर वेळेत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर पुढील तीव्र आंदोलनाचा इशाराही काही कार्यकर्त्यांनी दिला आहे. आजच्या भेटीवेळी ‘खोज’ संस्थेचे ॲड. बंड्या साने यांच्याशिवाय अविनाश बेलसरे, रामबाबू दहिकर, दशरथ बावनकर, रामदास हिवराळे, करण दारसिंबे, विठ्ठल खडके, तुळशीराम येऊल, गणेश बेलसरे, देवराव भुसूम, लक्ष्मण बेलसरे, अनिलबाबू मावस्कर, सोनी मावस्कर, वैशाली मावस्कर, बबिता जामुनकर, समोती बेलसरे, संगीता दहिकर, शेवंता भुसूम, लीला भुसूम, प्रमिला कास्देकर, जानकी जामुनकर, रामकली बेलसरे, संभवी वाळके आदी उपस्थित होते.
Source link
मेळघाटातील समस्यांवर आदिवासींची कलेक्टर, सीईओंकडे धडक:अधिकाऱ्यांनी समस्या ऐकून सोडवण्याचे आश्वासन दिले