Headlines

अयोध्या मंदिर दानपेटी चोरीत 3 कोटींपर्यंत अपहार:कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराजांचा दावा; राजीनाम्याच्या चर्चा फेटाळल्या




अयोध्या राम मंदिरातील दानपेटीतून झालेल्या चोरीप्रकरणी अयोध्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी मोठे विधान केले आहे. त्यांच्या मते, या चोरीत सुमारे तीन कोटी रुपयांपर्यंतचा अपहार झाला असावा. मोठ्या प्रमाणात सोने, चांदीचे दागिने आणि रक्कम चोरीला गेल्याचे दावे चुकीचे असून, याबाबत ‘पराचा कावळा’ केला जात असल्याचे त्यांनी म्हटले. या चोरीचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गोविंदगिरी महाराजांनी सांगितले की, या प्रकरणाची एसआयटी सखोल चौकशी करत आहे. मंदिरात 2926 वस्तू दान म्हणून आल्या होत्या, ज्याची माहिती माध्यमांसमोर ठेवण्यात आली आहे. दान केलेल्या सर्व वस्तू सुरक्षित आहेत. सिंधी समाजाने चांदीच्या 200 विटा दान केल्याचे सांगितले होते, त्याबाबत त्यांनी एक पत्र पाठवले होते. ट्रस्टने उत्तर दिल्यावर सिंधी समाजाने ट्रस्टची माफी मागितली, असेही महाराजांनी पत्रकार परिषदेत सांगितले. प्रसारमाध्यमांमध्ये अयोध्या ट्रस्टच्या कोषाध्यक्ष पदावरून मी राजीनामा देणार असल्याच्या चर्चा चुकीच्या असल्याचे गोविंदगिरी महाराजांनी स्पष्ट केले. “मी मैदान सोडून पळून जाणारा नाही, तर अखेरपर्यंत लढा देत राहणार आहे,” असे ते म्हणाले. राजीनाम्याबाबत खोडसाळपणे चुकीचे वृत्त पसरवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पुण्यात त्यांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी पाच फ्लॅट ट्रस्टच्या नावावर असून, त्यांच्या नावावर केवळ एक बँक खाते आहे आणि कोणतीही वैयक्तिक संपत्ती नाही, असेही त्यांनी नमूद केले. गोविंदगिरी महाराजांनी सांगितले की, चंपतराय आणि अनिल मिश्रा यांनी स्वतःहून पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या हलगर्जीपणामुळेच ते जबाबदार ठरले आणि त्यांनी राजीनामे दिले. कोषाध्यक्ष म्हणून आपलीही जबाबदारी असल्याचे त्यांनी मान्य केले. मंदिरात येणाऱ्या धनावर लक्ष ठेवणे हे आपले काम असल्याचे ते म्हणाले. मंदिरात ‘समर्पण हुंडी’मध्ये जमा झालेल्या धनाचा अपहार झाला आहे. ही रोजची प्रक्रिया असून, स्थानिक न्यासी त्याचे काम पाहत होते. मात्र, ते कामात ढिले पडल्यामुळे हा प्रकार घडल्याचे गोविंदगिरी महाराजांनी सांगितले. सध्या सुरू असलेल्या चौकशीवर आपण समाधानी असल्याचेही त्यांनी नमूद केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *