Headlines

राष्ट्रवादीत पुन्हा मोठ्या भूकंपाची नांदी?:शरद पवारांच्या 9 आमदारांचा 'NDA'कडे कल; जयंत पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष




महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील ऐतिहासिक फुटीनंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारही वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात विधान भवनात झालेल्या एका गुप्त बैठकीने या चर्चांना उधाण आणले आहे. आमदारांचा एनडीएसोबत जाण्याचा कल? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधिमंडळ अधिवेशनादरम्यान शरद पवार गटाच्या आमदारांची एक महत्त्वाची बैठक जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीची आतली माहिती आता समोर येत आहे. पक्षाचे एकूण 10 आमदारांपैकी 9 आमदार या बैठकीला उपस्थित होते. जयंत पाटील यांनी या सर्व आमदारांची मते आणि मतदारसंघातील अडचणी जाणून घेतल्या. भाजप आणि ‘एनडीए’ला पसंती! बैठकीत बहुतांश आमदारांनी भाजप आणि एनडीएसोबत (NDA) जाण्याचा कल दर्शवला आहे. मात्र, यामध्ये एक मोठी अट ठेवण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील न होता, थेट भाजपप्रणीत एनडीएचा घटक पक्ष म्हणून काम करावे, अशी गळ आमदारांनी जयंत पाटलांना घातली आहे. मतदारसंघातील रखडलेल्या विकासकामांसाठी मिळणारा शासकीय निधी आणि आगामी 2029च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय यश मिळवण्यासाठी सत्तेसोबत जाणे आवश्यक असल्याचे मत या आमदारांनी मांडले आहे. रोहित पवारांचा तीव्र विरोध; शरद पवार मैदानात उतरणार! या संपूर्ण घडामोडींमध्ये आमदार रोहित पवार यांनी या बैठकीपासून स्वतःला अलिप्त ठेवले होते. भाजप किंवा एनडीएसोबत जाण्यास रोहित पवार यांचा तीव्र विरोध असल्याचे समजते. बैठकीनंतर रोहित पवारांनी सर्व आमदारांशी फोनवरून संपर्क साधून त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आमदारांच्या या भूमिकेनंतर आता अंतिम निर्णय घेण्यासाठी चेंडू शरद पवारांच्या कोर्टात गेला आहे. जयंत पाटील यांनी आमदारांना सांगितले की, “मी या सर्व आमदारांची भावना आणि निरोप पक्षप्रमुख शरद पवारांपर्यंत पोहोचवेन.” सूत्रांच्या माहितीनुसार, या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी स्वतः शरद पवार लवकरच आमदार आणि खासदारांची एक संयुक्त बैठक बोलावणार आहेत, ज्यानंतर पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट होईल. जयंत पाटील शत्रूच्या छावणीत जाणार नाहीत”; संजय राऊतांचा दावा या संपूर्ण राजकीय घडामोडींवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाष्य करत शरद पवार गटाची बाजू लावून धरली आणि भाजपवर निशाणा साधला. संजय राऊत म्हणाले, “काही दिवसांपूर्वीच माझे खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याशी बोलणे झाले. त्यांनी स्पष्ट केले आहे की, मीडियामध्ये येणाऱ्या या सर्व बातम्या निव्वळ अफवा आहेत. प्रादेशिक पक्षांमध्ये स्थिरता राहू नये म्हणून मोदी-शहा या बाह्य शक्तींकडून मुद्दाम अशा अडचणी आणि संभ्रम निर्माण केले जात आहेत.” जयंत पाटलांच्या विचारधारेवर विश्वास जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळून लावताना राऊत म्हणाले, “जयंतराव पाटील हे शाहू, फुले, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी विचारांच्या मुशीत तयार झालेले नेते आहेत. ते ज्या भागातून येतात तो क्रांतिकारकांचा इतिहास आहे. त्यामुळे जयंतराव हे जातीय आणि धर्मांध शक्तींसोबत जातील, असे त्यांच्या शत्रूंनाही वाटणार नाही.” शरद पवारांचा पक्षच मूळ राष्ट्रवादी राऊत यांनी ठणकावून सांगितले की, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असून शशिकांत शिंदे त्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत. इतर गट हे अमित शहांचे पक्ष आहेत. त्यामुळे रोहित पवार, आर. आर. पाटलांचे चिरंजीव आणि इतर आमदार पक्षाच्या पुरोगामी विचारांशी बांधील राहतील आणि शरद पवार या सर्व अडचणी दूर करण्यास पूर्णपणे सक्षम आहेत. संबंधित बातमी वाचा… सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला पक्षातूनच थेट आव्हान!:राष्ट्रवादीत अंतर्गत कलह उफाळला; प्रफुल्ल पटेल म्हणाले- त्या नोटीसला फार महत्त्व देण्याचे कारण नाही
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली. मात्र, आता त्यांच्या या निवडीला थेट पक्षातूनच आव्हान देण्यात आले आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव आणि ज्येष्ठ नेते सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत नोटीस पाठवून सुनेत्रा पवारांच्या निवडीवर आक्षेप नोंदवला असून राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल्ल पटेल-सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार-पार्थ पवार असा अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *