![]()
शहरातील जुने शहर परिसरात ‘वैष्णवी शिवण क्लास’ च्या वतीने स्थानिक महिलांसाठी अल्प दरात शिलाई मशीन वाटप आणि एक महिन्याच्या विशेष प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने शीतल गिरी यांनी या उपयुक्त उपक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला जुने शहर परिसरातील शेकडो महिलांनी उपस्थित राहून अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने झाली. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वानखडे सर, तर अतिथी म्हणून संभाजी ब्रिगेडचे अकोला महानगर अध्यक्ष देवा गावंडे, शहर सचिव ऋषभ काळे आणि हर्षल इंगळे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे वानखडे म्हणाले की, “शहरातील महिलांनी केवळ घरगुती कामात व्यस्त न राहता, आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी शिवण कलेसारख्या कौशल्यांचा वापर केला पाहिजे. शिवणकला ही एक प्राचीन आणि सन्मानाची कला असून, ती शिकून महिलांनी स्वतः पायावर उभे राहावे आणि इतर महिलांनाही यासाठी प्रोत्साहित करावे. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शीतल गिरी या दरवर्षी वैष्णवी शिवण क्लासच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. या कार्यक्रमात त्यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “एक महिन्याचे शिवणकला प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महिलांना घरातूनच स्वयंरोजगार कसा सुरू करता येईल आणि त्यातून आर्थिक प्रगती कशी साधता येईल, याचे नियोजन करण्यात आले आहे.” जुने शहर परिसरातील महिलांनी या सुवर्ण संधीचा मोठ्या संख्येने लाभ घेतला. या उपक्रमाचे संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी देवा गावंडे, ऋषभ काळे यांनी कौतुक केले. स्वयंरोजगाराची हमी;मोठी संधी शिवणकामाचे प्रशिक्षण केवळ शिकण्यापुरते मर्यादित न ठेवता, त्यातून शाश्वत उत्पन्न कसे मिळवावे यावर कार्यक्रमात विशेष भर देण्यात आला. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर महिलांना स्वतःचा घरगुती व्यवसाय सुरू करण्यासाठी वैष्णवी शिवण क्लासतर्फे आवश्यक ते व्यावसायिक मार्गदर्शन केले जाणार आहे, जेणेकरून प्रत्येक महिलेला हक्काचा रोजगार मिळेल.
Source link
अल्प दरात शिलाई मशीन; एक महिन्याचे प्रशिक्षण:स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे आवाहन; तंत्रशुद्ध मार्गदर्शन