Headlines

आता पुन्हा 'पवार विरुद्ध पवार' लढाई नको:एकमेकांविरुद्ध लढलो त्याचं दु:ख, रोहित पवारांच्या विधानावर युगेंद्र पवारांचे मत




दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी आज पोटनिवडणूक पार पडत आहे. या निमित्ताने गेल्या काही काळापासून दुभंगलेले पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र, असे असतानाच २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा ‘पवार विरुद्ध पवार’ असा सामना रंगण्याची शक्यता आमदार रोहित पवार यांनी वर्तवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या विधानावर युगेंद्र पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. आज सकाळी मतदानाची प्रक्रिया सुरू होताच महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी “प्रत्येक बारामतीकराने घराबाहेर पडून मतदान करावे,” असे आवाहन केले. विशेष म्हणजे, शरद पवार यांनी स्वतः उपस्थित नसले तरी सुनेत्रा पवार यांना मतदान करण्याचे आवाहन बारामतीकरांना केले आहे. यामुळे या निवडणुकीत संपूर्ण पवार कुटुंब एकवटल्याचे पाहायला मिळत आहे. २०२९ ला पुन्हा ‘पवार विरुद्ध पवार’? – रोहित पवार आज सकाळी मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, “२०२९ च्या निवडणुकीत बारामतीत पुन्हा एकदा सर्वपक्षीय लढाई पाहायला मिळू शकते. जर सुनेत्रा काकी रिंगणात नसतील, तर महायुतीकडून जय पवार उमेदवार असतील, तसेच महाविकास आघाडीकडून युगेंद्र पवार रिंगणात असू शकतात. कार्यकर्त्यांची आणि पक्षाची जी इच्छा असते, ती नेत्यांना ऐकावी लागते.” रोहित पवारांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. “आता लढाई नको!”; युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया रोहित पवारांच्या या विधानावर बोलताना युगेंद्र पवार यांनी आपली नापसंती व्यक्त केली. “रोहित पवारांनी जे म्हटलं, ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. यापूर्वी लोकसभा आणि विधानसभेला आपण एकमेकांविरुद्ध लढलो, त्याचे दुःख आजही आहे. आता आम्ही कुटुंब म्हणून पुन्हा एकत्र आलो आहोत. त्यामुळे पुन्हा अशी लढाई व्हावी, अशी आमची अजिबात इच्छा नाही,” अशा शब्दांत त्यांनी कुटुंबातील एकजुटीला प्राधान्य दिले. जय पवारांची भूमिका दुसरीकडे जय पवार यांनी मात्र संयमी भूमिका घेतली. “२०२९ मध्ये मी उमेदवार व्हावे अशी कार्यकर्त्यांची मागणी असली, तरी मला सध्या केवळ कार्यकर्ता म्हणून काम करायचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. श्रीनिवास पवारांनी टोचले कान अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांनीही तरुण पिढीच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. “आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण सगळे मिळून दादांसाठी एकत्र आलो आहोत. अशा वेळी २०२९ च्या गोष्टी बोलण्याची अजिबात गरज नव्हती. अजून बराच प्रवास बाकी आहे, आजच्या दिवसाचे गांभीर्य राखायला हवे होते,” असे म्हणत त्यांनी रोहित पवार यांचे कान टोचले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *