Headlines

आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 25 वा दीक्षांत समारंभास उत्साहात:विद्यार्थ्यांच्या सेवाकार्यामुळे गरजू रुग्णांच्या जीवनात येईल आशेचा किरण – राज्यपाल वर्मा




विद्यार्थ्यांनी घेतलेले ज्ञान ही एक सामाजिक जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या सेवा कार्यामुळेच रुग्णांच्या जीवनात आशेचा किरण येईल असे प्रातिपादन विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 25 वा दीक्षांत समारंभ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षेत संपन्न झाला. या समारंभास राज्याचे अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ उपस्थित होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून नागपूरचे आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनंत पंढरे उपस्थित होते. समवेत राज्यपाल यांचे सचिव डॉ. प्रशांत ननावरे उपस्थित होते. व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरु (अतिरिक्त कार्यभार) प्रा. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू व विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी सांगितले की, आरोग्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांची करुणा, सहानुभूती आणि प्रामाणिकपणा महत्वपूर्ण ठरणार आहे. विकसित भारत २०४७ ही संकल्पना साकारण्यात आरोग्य क्षेत्राची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी आरोग्य व्यावसायिक केवळ वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असणे पुरेसे नाही. त्यासाठी तंत्रज्ञानाचे ज्ञान, संशोधनाची दृष्टी, नैतिक बांधिलकी आणि सामाजिक जबाबदारीही असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ या मूलभूत बाबींना बळकटी देत आहे ही समाधानाची बाब आहे. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे आधुनिकीकरण, शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा, संशोधनाला प्रोत्साहन आणि विद्यापीठ प्रशासन अधिक पारदर्शक व विद्यार्थी-केंद्रित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे प्रतिबिंब कुलगुरूंच्या अहवालात दिसून येते. आरोग्य क्षेत्रातील घडामोडींची माहिती देणारे केंद्र म्हणून विद्यापीठात ’इक्षणा’ म्युझियम साकारण्यात येत आहे. त्याचा माहितीसाठी सर्वांना उपयोग होईल. विद्यापीठात पेपरलेस प्रशासन, डिजिटल प्रमाणपत्रे, अॅकेडॅमिक बँक ऑफ क्रेडीटस आणि तंत्रज्ञानाधारित सेवा यांसारख्या उपक्रमांमधून विद्यापीठाची सुशासन आणि कार्यक्षम सेवा देण्याची बांधिलकी दिसून येते असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, संशोधन प्रकल्पांसाठी आर्थिक सहाय्य, शिक्षक विकास कार्यक्रम, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांशी सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण केंद्राची स्थापना यामुळे विद्यापीठाची जागतिक स्तरावरील ओळख अधिक मजबूत होईल. संशोधनातून ज्ञानाची वाढ होते आणि हेच संशोधन आरोग्यसेवेमध्ये परिवर्तन घडवून नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवते. यावेळी मनोगत व्यक्त करतांना नागपूरचे आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनंत पंढरे यांनी सांगितले की, यश हे केवळ विद्यार्थ्यांचे नसून त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणाऱ्या आई-वडील, कुटुंबीय आणि मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांच्या कष्टाचे आणि त्यागाचे फलित आहे. नीट परीक्षेपासून सुरू झालेला हा कठीण प्रवास आज यशस्वी पदवीदानाने पूर्ण होत आहे असे त्यांनी सांगितले. आरोग्य सेवा ही केवळ पदवी नसून समाजातील गरिबांची आणि गरजूंची सेवा करण्याचे एक पवित्र माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कुलगुरु (अतिरिक्त कार्यभार) प्रा. संजीव सोनवणे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, विद्यापीठाच्या माध्यमातून आरोग्य विषयक विविध अभ्यासक्रम शिकविले जातात. संशोधन, नावीण्यपूर्ण उपक्रमांना चालना देण्यात येत आहे. ज्ञान, कौशल्य, सहानुभूती आणि नैतिक मूल्यांसह समाजाची सेवा करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे. विद्यापीठ कामकाजात डिजिलायजेशन करण्यात आले असून ऑनलाइन परीक्षा फॉर्म, हॉल तिकिटे, परीक्षक व्यवस्थापन आणि अंतर्गत मूल्यमापन कार्य पद्धतीचा समावेश आहे. आरोग्य शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी विद्यापीठाने विविध संशोधन कार्यशाळा आयोजित केल्या. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाला चालना देण्यासाठी, विद्यापीठाने विविध संशोधन अनुदान योजनांतर्गत दोनशे पेक्षा अधिक संशोधन प्रकल्पांना आर्थिक सहाय्य मंजूर केले आहे. विविध ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करुन संशोधन, आरोग्य आणि समाजसेवेबाबत काम केले आहे. विद्यापीठाने सहकार्यात्मक संशोधन आणि शैक्षणिक सहकार्याला चालना देण्यासाठी अनेक नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठे व संस्थांसोबत सामंजस्य करार केले असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, विद्यापीठाने विद्यार्थ्यांना क्रीडा, सांस्कृतिक आणि संशोधन स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. प्रशासकीय आणि शैक्षणिक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, कार्यक्षमता व पारदर्शकतेसाठी आधुनिक, तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला आहे. शिक्षण, संशोधन, डिजिटल प्रशासन, गुणवत्ता आश्वासन आणि समाजोन्मुख आरोग्य सेवेतील उत्कृष्टतेद्वारे देशातील एक अग्रगण्य विद्यापीठ म्हणून आपले स्थान मजबूत करते. यावेळी डी. लिट पदवीने सन्मानित डॉ. सदानंद सरदेशमुख यांनी सांगितले की, आयुर्वेद क्षेत्रात शिक्षण, सेवा आणि मानव कल्याणासाठी काम केले. साहित्य, शिक्षण, संशोधन, आरोग्य सेवा आणि वारशाचे जतन आणि संवर्धनासाठी मी प्रयत्नशील. जीवनातील चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ शैक्षणिक सेवेसाठी समर्पित केला आहे. एकात्मिक कर्करोग संशोधन प्रकल्पाच्या माध्यमातून सेवा सुरू केली. या उपक्रमाच्या माध्यमातून सोळा हजारांहून अधिक कर्करोगाच्या रुग्णांना लाभ झाला आहे. याबरोबरच एचआयव्ही एड्स, संधीवात, महिला व बालकल्याण, हाडांच्या उपचारावर मोठया संशोधन केले आहे. विद्यापीठाने माझ्या कार्याची दखल घेऊन सन्मान केला याचा मला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी कुलपती महोदयांना दीक्षांत समारंभाबद्दल विनंती केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व डि.लिट् मानपत्राचे वाचन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी मान्यवरांचे आभार मानले. 12,263 स्नतकांना पदवी प्रदान या दीक्षांत समारंभात शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या 12,263 स्नतकांना पदवी प्रदान करण्यात आली आहे. विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्यांना 99 विद्यार्थ्यांना 146 सुवर्णपदक, एक विद्यार्थ्यास रोखरक्कम पारितोषिक व संशोधन पूर्ण केलेल्या 20 विद्यार्थ्यांना पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवी प्रदान करण्यात आली. कोणत्या शाखेतून किती स्नतकांना पदवी प्रदान ? या दीक्षांत समारंभात वैद्यकीय विद्याशाखा पदवीचे 6,621, दंत विद्याशाखा पदवीचे 2,192, आयुर्वेद व युनानी विद्याशाखा पदवीचे 133, होमिओपॅथी विद्याशाखा पदवीचे 405, नर्सिंग विद्याशाखा पदवीचे 732, फिजिओथेरपी व ऑक्युपेशनल थेरपी पदवीचे 369 तसेच पदव्युत्तरचे वैद्यकीय विद्याशाखेचे 207, दंत, बी.एससी. पॅरामेडिकलचे 315, आयुर्वेद, यूनानी व होमियोपॅथीचे 1,272, तत्सम विद्याशाखेचे 17 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान आली आहे. दीक्षांत समारंभाचा प्रारंभ विव्दजनांच्या मिरवणुकीने झाला. तद्नंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यापीठाचे प्राधिकरण सदस्य, संलग्नित महाविद्यालाचे शिक्षक, विद्यार्थी, पालक व अभ्यागतांनी मोठया संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *