![]()
लक्ष्मीरमण गोविंदा… गोविंदा…च्या जयघोषाने आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादाने संपूर्ण उंडणगाव परिसर भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला. निमित्त होते येथील प्रसिद्ध श्री बालाजी लळीत महोत्सवाचे. या महोत्सवानिमित्त लाखाच्या वर भाविकांनी हजेरी लावली होती. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी ग्रामस्थ, युवक मंडळ आणि स्वयंसेवी संस्थांनी चोख नियोजन केले होते. पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र दर्शन रांगांची व्यवस्था केल्यामुळे उन्हाच्या तीव्रतेतही भाविकांना सुलभ आणि सुरळीत दर्शन घेता आले. कडक उन्हाचा त्रास भाविकांना होऊ नये म्हणून गावातील विविध मित्र मंडळांनी परिश्रम घेतले. गावामध्ये जागोजागी भाविकांसाठी थंड पाणी, सरबत, शिरा आणि पोहे यांचे वाटप करण्यात येत होते. महोत्सवाच्या ११ दिवसांच्या कालावधीत पंगतीत तब्बल ३४० क्विंटल अन्नदान करण्यात आले. यात पोळी -भाजी, वरण -भात, बुंदी प्रसाद यांचा समावेश होता . हा सोहळा यशस्वी करण्यासाठी देवस्थानचे मुकुंद धनवई, डॉ. टी. आर. सनान्से, नारायण भागवत, रत्नाकर खुल्लोडकर यांच्यासह समस्त उंडणगाव ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
Source link
उंडणगाव येथे बालाजी लळीत महोत्सवात भक्तीचा महासागर:लाखाहून अधिक भाविक-भक्तांनी घेतले बालाजीचे दर्शन