Headlines

एकाच शहरात गॅस बुकिंगचे दोन नियम:इंडेन ग्राहकांना 45, एचपीसीएलला 25 दिवसांची अट; तहसीलदारांकडे तक्रार




चांदूर रेल्वे शहरातील घरगुती गॅस रिफिलिंगच्या नियमांमध्ये मोठी तफावत आढळली आहे. इंडेन कंपनीच्या ग्राहकांना रिफिलिंगसाठी ४५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागते, तर एचपीसीएलचे ग्राहक २५ दिवसांतच सिलेंडर मिळवू शकतात. या असमान नियमांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, त्यांनी याबाबत तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, एकाच शहरात गॅस बुकिंगसाठी वेगवेगळे नियम लागू करणे योग्य नाही. सध्या इंडेन गॅस एजन्सीच्या ग्राहकांना पुढील सिलेंडर बुक करण्यासाठी ४५ दिवसांची मुदत आहे, तर एचपीसीएलतर्फे २५ दिवसांत रिफिलिंग केले जाते. निरंजन वंजारी, राजेश चौधरी, प्रफुल्ल मोहोड आणि देवराव सगळे या ग्राहकांनी या विरोधाभासाबाबत तहसीलदारांकडे लेखी तक्रारी सादर केल्या आहेत. नगर परिषद क्षेत्रातील ग्राहकांसाठी गॅस रिफिल बुकिंगची मुदत २५ दिवस असणे अपेक्षित आहे. मात्र, चांदूर रेल्वे येथील इंडेन गॅस ग्राहकांना ४५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत असल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच शहरात एचपीसीएल गॅस एजन्सीमध्ये बुकिंगची मुदत २५ दिवसांची असल्याने, एकाच नगर परिषद क्षेत्रात दोन कंपन्यांच्या नियमांमध्ये २० दिवसांची तफावत का, असा प्रश्न ग्राहक विचारत आहेत. इंडेन आणि एचपी या दोन्ही कंपन्यांच्या ग्राहकांना एकाच नागरी क्षेत्रात वेगवेगळे नियम का, याचे स्पष्ट उत्तर संबंधित प्रशासन आणि गॅस वितरण यंत्रणेने द्यावे, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. गॅस सिलेंडर हा प्रत्येक कुटुंबाच्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक घटक असल्याने, बुकिंगच्या मुदतीबाबत स्पष्ट, समान आणि पारदर्शक नियम असणे गरजेचे आहे. ग्राहकांच्या लेखी तक्रारीची दखल घेत चांदूर रेल्वे तहसीलदारांनी व्यवस्थापक, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि नागपूर येथील एरिया मॅनेजर यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात “गॅस रिफिलिंग बुकिंग मुदतीबाबत” विषय नमूद करत, एकाच नागरी क्षेत्रात इंडेन आणि एचपी गॅसच्या बुकिंग मुदतीत तफावत का आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. दत्त इंडियन गॅस, चांदूर रेल्वेचे जितेंद्र गोरे यांनी सांगितले की, “नागरिकांनी केलेल्या तक्रारींचे त्वरित निवारण व्हावे, अशी आमचीही इच्छा आहे. त्यासाठीच आमच्या गॅस एजन्सीमार्फतही आम्ही तहसीलदारांना पत्र दिले आहे. त्याबाबत आता काय निर्देश दिले जातात, हे त्यांच्यामार्फतच आम्हाला कळणार आहे.” चांदूर रेल्वेकरांचे लक्ष आता या तक्रारीवर काय कारवाई होते याकडे लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *