![]()
ठाणे महानगरपालिकेतील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख या सध्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणामुळे अडचणीत सापडल्या असताना एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. गेल्या 24 तासांपासून ‘नॉट रिचेबल’ असलेल्या सहर शेख अचानक मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दिसल्या. 16 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात झालेला आयपीएल सामना पाहण्यासाठी त्या मैदानात उपस्थित होत्या. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला आहे. सहर शेख यांनी स्वतः त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून स्टेडियममधील व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओसोबत त्यांनी गेम ओव्हर… अशी कॅप्शन देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यासोबतच तूने ना जाना तेरे जाने से क्या क्या हुआ… हे गाणंही त्यांनी शेअर केलं. त्यांच्या या पोस्टमुळे त्यांनी विरोधकांना पुन्हा डिवचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सोशल मीडियावरही या स्टोरीची जोरदार चर्चा रंगली. गेल्या दोन दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ असलेले सहर शेखचे वडील युनूस शेख गुरुवारी अचानक मुंब्रा पोलिस ठाण्यात हजर झाले. यावेळी त्यांनी सहरवर होत असलेले सर्व आरोप फेटाळून लावत, दोन दिवसांत आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, सर्वांना करारा जवाब मिळेल, असा इशारा माध्यमांशी बोलताना दिला.
दरम्यान, सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख यांच्यावर बनावट जात प्रमाणपत्राचा गंभीर आरोप आहे. त्यांनी चुकीची कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे सहर शेख यांचे नगरसेवकपद धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तक्रारीनुसार, युनूस शेख हे उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथून महाराष्ट्रात स्थलांतरित झाले होते. स्थलांतरितांसाठी नमुना 10 लागू असताना त्यांनी नमुना 8 चा वापर करून अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. या प्रक्रियेतून बनावट जात प्रमाणपत्र मिळवण्यात आले आणि त्याच आधारे सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रमाणपत्र घेतले, असा दावा तक्रारदारांनी केला आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी ठाणे महापालिका निवडणूक लढवली आणि विजयी झाल्या. या प्रकरणात सिद्दीकी अहमद यांनी ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी या प्रमाणपत्राची पडताळणी करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जात असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सहर शेख यांनी यंत्रणांची दिशाभूल केल्याचा आरोपही तक्रारदारांनी केला आहे. सहर शेख पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी सहर शेख या जानेवारी 2026 मध्ये झालेल्या निवडणुकीत मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक 30 मधून एमआयएमच्या तिकिटावर विजयी झाल्या होत्या. निवडणुकीच्या काळात त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली होती. आता मात्र त्यांच्यावरील आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकीकडे कायदेशीर संकट आणि दुसरीकडे वानखेडेवरील उपस्थिती यामुळे सहर शेख पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.
Source link
एमआयएमच्या सहर शेख पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी:नगरसेवकपदावर संकट, तरी वानखेडेवर; सोशल मीडियावर ‘गेम ओव्हर’ पोस्ट