![]()
गंगापूर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर आणि शेजारील अहिल्यानगर जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा मानला जाणारा गंगापूर ते कायगाव हा ८ किलोमीटरचा रस्ता पहिल्याच पावसाळ्यात पूर्णपणे चिखलमय झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदाराच्या ढिसाळ व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या मुख्य मार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून, हा रस्ता आता वाहतुकीसाठी पूर्णपणे अयोग्य बनला आहे. यामुळे वाहनधारकांना जीवघेणी कसरत करावी लागत असून नागरिकांना आता थेट १२ किलोमीटरचा लांबचा वळसा घालून भेंडाळा फाट्यावरून प्रवास करावा लागत आहे. गंगापूर ते कायगाव हा रस्ता गेल्या ८ ते १० वर्षांपासून सातत्याने दुरवस्थेत आहे. या रस्त्याची डागडुजी आणि दुरुस्ती करण्यासाठी काही वर्षांपूर्वी प्रति किलोमीटर १ कोटी रुपये याप्रमाणे तब्बल ८ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च करण्यात आला होता. मात्र, संबंधित कंत्राटदाराने केलेल्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अवघ्या ६ महिन्यांतच हा रस्ता पुन्हा उखडला गेला. सध्या या संपूर्ण ८ किलोमीटरच्या मार्गावर २ ते ५ फुटांचे हजारो जीवघेणे खड्डे पडले आहेत. स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मागील पाच-सहा वर्षांत या रस्त्यासाठी अनेक वेळा तीव्र आंदोलने केली, परंतु प्रशासनाने केवळ खड्ड्यांमध्ये तात्पुरता मुरूम टाकण्यापलीकडे कोणतीही ठोस व कायमस्वरूपी कारवाई केली नाही. गंगापूर ते कायगाव रस्ता चिखलमय झाला असून, वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ६ किमी कामास निधी कधी मिळणार हा रस्ता कायगावपर्यंत खरोखर पूर्ण होणार की नाही? उर्वरित ६ किलोमीटरच्या कामाला निधी कधी मिळणार? असे अनेक अनुत्तरित प्रश्न सध्या प्रलंबित आहेत. परिसरातील लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या कामातील संभ्रमाबाबत वस्तुस्थिती जनतेसमोर स्पष्ट करावी आणि तत्काळ या ८ किलोमीटरच्या रस्त्याची दुरुस्ती करून जनतेला या चिखलातून व खड्ड्यातून दिलासा द्यावा, अशी मागणी गंगापूर तालुक्यातील नागरिकांमधून केली जात आहे. प्रशासनाने टाकलेला हाच निकृष्ट दर्जाचा मुरूम आता पहिल्याच पावसात संपूर्ण चिखलाचे मुख्य कारण ठरला आहे. चिखलाचे साम्राज्य पसरल्यामुळे या मुख्य रस्त्यावरून सध्या ९० टक्क्यांपेक्षा जास्त अवजड आणि लहान वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. याशिवाय प्रवाशांना नेवासा, शेवगाव आणि अहिल्यानगरकडे जाण्यासाठी १० ते १२ किलोमीटरचा अतिरिक्त वळसा घालावा लागत असल्याने प्रवाशांचा वेळ, पैसा आणि महागड्या इंधनाचा मोठा अपव्यय होत आहे. रस्ता मंजुरीबाबत संभ्रम कायगाव ते देवगाव या ३९ किलोमीटरच्या मुख्य रस्त्यासाठी २२ जून २०२३ रोजी ५४० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली. मात्र, त्यानंतर राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर अंतर कमी करून ३३ किलोमीटरच्या कामासाठी २२९ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. सध्या देवगाव ते मालुंजा दरम्यान अत्यंत कासवगतीने या रस्त्याचे काम सुरू आहे.
Source link
कोट्यवधींचा खर्च पाण्यात:पहिल्याच पावसामध्ये गंगापूर ते कायगावरस्ता चिखलमय; वाहनधारकांची गैरसोय