Headlines

छत्रपती संभाजीनगरात महावितरणची मान्सूनपूर्व कामे सुरू:मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन, ग्राहकांना एसएमएसद्वारे सूचना




छत्रपती संभाजीनगर येथे महावितरणने मान्सूनपूर्व दुरुस्ती कामांना गती दिली आहे. गेल्या २२ दिवसांपासून सुरू असलेल्या या कामांमध्ये ३३ केव्हीच्या २८ पैकी ६ उपकेंद्रांची दुरुस्ती पूर्ण झाली असून, ७ उपकेंद्रांचे काम प्रगतीपथावर आहे. उर्वरित कामे टप्प्याटप्प्याने सुरू असून, मे महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन महावितरणने केले आहे. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि विद्युत सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून ही कामे हाती घेण्यात आली आहेत. छत्रपती संभाजीनगर परिमंडळातील वीज उपकेंद्रे आणि वीजवाहिन्यांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे वेगाने सुरू आहेत. दर शुक्रवारी ग्राहकांना पूर्वसूचना देऊन दुरुस्तीची कामे केली जातात, तसेच स्थानिक गरजेनुसार इतर दिवशीही अत्यावश्यक कामे हाती घेतली जात आहेत. दुरुस्तीदरम्यान बाधित होणाऱ्या क्षेत्राला पर्यायी यंत्रणेद्वारे वीजपुरवठा देण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कामांच्या सद्यस्थितीनुसार, २८ पैकी ६ उपकेंद्रांची कामे पूर्ण झाली असून, ७ उपकेंद्रांचे काम प्रगतीपथावर आहे. एकूण ४७ पैकी १६ ३३ केव्ही वाहिन्यांची कामे पूर्ण झाली असून, २१ वाहिन्यांवर काम सुरू आहे. तसेच, २१२ पैकी ३५ ११ केव्ही वाहिन्यांची कामे पूर्ण झाली असून, १०३ वाहिन्यांचे काम प्रगतिपथावर आहे. या दुरुस्ती कामांमध्ये पावसाळ्यात वीजपुरवठ्यात व्यत्यय येऊ नये यासाठी अनेक तांत्रिक बाबींचा समावेश आहे. यामध्ये वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे, तुटलेले पिन व डिस्क इन्सुलेटर्स बदलणे, रोहित्रांचे (ट्रान्सफॉर्मर) अर्थिंग तपासणे, ऑइल फिल्टरेशन करणे, गंजलेले वीजखांब आणि जुन्या तारा बदलणे, तसेच उपकेंद्रातील ब्रेकर्सची दुरुस्ती करणे इत्यादी कामे केली जात आहेत. ज्या ग्राहकांनी आपला मोबाईल क्रमांक महावितरणकडे नोंदवला आहे, त्यांना पूर्वनियोजित वीज कपातीची माहिती एसएमएसद्वारे दिली जात आहे. ज्या ग्राहकांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ / १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर, महावितरणच्या संकेतस्थळावर किंवा मोबाइल अ‍ॅपवर आपला क्रमांक नोंदवावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने महावितरणने नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. वादळामुळे झाडांच्या मोठ्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडण्याची शक्यता असते. त्यामुळे संबंधित संस्था किंवा मालमत्ता मालकांनी महानगरपालिकेची परवानगी घेऊन फांद्यांची छाटणी करावी, यासाठी महावितरण तांत्रिक सहकार्य करेल. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी काम सुरू असताना वीजपुरवठा बंद ठेवावा लागतो, त्यामुळे ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *