Headlines

डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण; रमेश म्हात्रेंना रुग्णालयातून डिस्चार्ज:आज कोर्टात हजर करणार; दोन डॉक्टरांचे राजीनामे, निलंबनाची मागणी जोरात




डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना थेट कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारण देत ते कळवा शासकीय रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र, न्यायालयाने प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. यापूर्वी रमेश म्हात्रे यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, न्यायाधीशांनी आरोपीला प्रत्यक्ष न्यायालयात हजर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यामुळे आज त्यांना न्यायालयात सादर केले जाणार असून पुढे पोलिस कोठडी वाढवली जाते की अन्य आदेश दिले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रकृतीचे कारण देत रुग्णालयात दाखल रमेश म्हात्रे यांना अटक होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर त्यांनी प्रकृती अस्वस्थ असल्याचे सांगत कळवा शासकीय रुग्णालयात दाखल झाल्याची चर्चा होती. उच्च रक्तदाब आणि इतर आरोग्यविषयक तक्रारींमुळे त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. प्रकृती स्थिर झाल्यानंतरच डिस्चार्ज देण्यात येईल, असे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले होते. अखेर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देऊन पोलिसांच्या ताब्यात न्यायालयाकडे रवाना करण्यात आले. चारही आरोपींची कोठडी संपली डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रे यांच्यासह अन्य तिघांना अटक करण्यात आली होती. या चौघांचीही पोलिस कोठडी संपत असल्याने सर्वांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. रमेश म्हात्रे यांच्या अनुपस्थितीमुळे यापूर्वी सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. रमेश म्हात्रेंवर 18 गुन्ह्यांची नोंद या प्रकरणानंतर रमेश म्हात्रे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीही चर्चेत आली आहे. त्यांच्याविरुद्ध यापूर्वी लहान-मोठे मिळून तब्बल 18 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. इतर आरोपींवरही विविध गुन्ह्यांची नोंद असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एका लोकप्रतिनिधीची अशी गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्यातून डॉक्टरांवर झालेला हल्ला यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. डॉक्टरांवरील हल्ल्यानंतर दोन डॉक्टरांचे राजीनामे या घटनेचे गंभीर पडसाद शास्त्रीनगर रुग्णालयात उमटले आहेत. रमेश म्हात्रे यांनी केलेल्या कथित अश्लील शिवीगाळ आणि मारहाणीमुळे मानसिक धक्का बसल्याने डॉ. सृष्टी बाविस्कर आणि डॉ. वैभव साळुंखे यांनी तडकाफडकी राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, डॉ. वैभव साळुंखे यांनी डोंबिवली सोडून आपल्या मूळ गावी अकोल्याला प्रस्थान केले आहे. तर डॉ. सृष्टी बाविस्कर यांनीही या घटनेनंतर पुन्हा रुग्णालयात काम करण्यास नकार दिल्याचे सांगितले जात आहे. रुग्णालयातील इतर कर्मचारीही या घटनेमुळे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याची माहिती आहे. नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. काँग्रेसच्या नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी रमेश म्हात्रे यांचे नगरसेवकपद तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या, “ज्या व्यक्तीने एका महिला डॉक्टरवर हात उचलला, ज्यांची प्रतिमा कायम मारामारी करणाऱ्या व्यक्तीची आहे, अशा व्यक्तीसोबत सभागृहात बसायलाही भीती वाटते. एका बाजूला ‘लाडकी बहीण’ योजनेची जाहिरात केली जाते आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी महिलांनाच मारहाण करतात. हे संपूर्ण सभागृहासाठी लाजिरवाणे आहे.” त्यांनी महिला नगरसेवकांच्या सुरक्षेचीही मागणी केली आहे. पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह या संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. अटकेची चाहूल लागताच रमेश म्हात्रे रुग्णालयात दाखल झाल्याचा आरोप करण्यात आला. तसेच पोलिसांनी सुरुवातीला न्यायालयीन कोठडीची मागणी केल्याने आणि ऑनलाईन सुनावणीला विरोध न केल्याने पोलिसांनी मवाळ भूमिका घेतल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली. न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता रमेश म्हात्रे यांना प्रत्यक्ष कल्याण न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यांना पुढील पोलिस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी, याचा निर्णय आज होणार आहे. त्याचबरोबर या प्रकरणात पक्षाकडून रमेश म्हात्रे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई किंवा निलंबनाची घोषणा होते का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. येथे वाचा संबंधित बातमी कल्याण मारहाण प्रकरण:श्रीकांत शिंदेंचे कठोर कारवाईचे आदेश; गुंडांची चड्डी-बनियानवर धिंड काढा, संजय राऊतांचा संताप कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये काल (मंगळवारी) एका महिला डॉक्टर, नर्स आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना थेट मारहाण आणि धक्काबुक्की केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर या मारहाणीचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या घटनेचे तीव्र पडसाद आता राजकीय वर्तुळातही उमटू लागले असून, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी यावरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी शिंदेंच्या माजी नगरसेवकाची महिला डॉक्टर अन् नर्सला मारहाण:कल्याणमधील संतापजनक प्रकार, घटनेचे CCTV फुटेज व्हायरल कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयातील एका महिला डॉक्टर, नर्स आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना थेट मारहाण आणि धक्काबुक्की करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांवर या मारहाणीचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या घटनेचे खळबळजनक सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *