Headlines

जयंत पाटलांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर:म्हणाले- ज्यांना सांगली-पेठ रस्त्यावरील खड्डे बुजवता आले नाहीत, ते मोदींना सल्ला देतायत




ज्यांना सांगली-पेठ रस्त्यावरील खड्डे बुजविता आले नाहीत, ते आता मोदींना सल्ला देतायत, असा टोला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना लगावला आहे. पेट्रोल-डिझेलच्या टंचाईवरून तसेच देशातील सध्याच्या परिस्थितीवरून जयंत पाटलांनी केंद्र सरकारवर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. यावर आता पडळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जयंत पाटलांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना गोपीचंद पडळकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या परदेश दौऱ्यात देशाच्या भविष्यासाठी समुद्रातून पाईपलाईनद्वारे थेट पेट्रोल-डिझेल आणता येईल का, याचे प्लॅनिंग करत आहेत. मात्र, काँग्रेस आणि महाआघाडीतील नेते त्यांच्यावर आरोप करत आहेत. ज्यांना सांगली-पेठ रस्त्यावरील खड्डे बुजविता आले नाहीत, ते आता मोदींना सल्ला देत असल्याची टीका त्यांनी जयंत पाटलांवर केली आहे. विरोधकांना काय अडचण आहे? पुढे बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, सोने खरेदी करू नका, सार्वजनिक वाहनांचा वापर करा, इंधन बचत करा, परदेश दौरे टाळा असे आवाहन मोदींनी केले. यात विरोधकांना काय अडचण आहे? यापूर्वीही देशावर संकट आल्यानंतर जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री यांनी जनतेला आवाहन केले होते. तेव्हा कुणी त्यावर प्रश्न उपस्थित केला नव्हता. अनेक देशात इंधनाचे दर वाढले आहेत. इतर देशांच्या तुलनेत भारतात इंधनाचे दर तितके वाढलेले नाहीत. मोदी देखील कधी तरी ट्रम्प यांना ढाक लावतील- सदाभाऊ खोत दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना घाबरतात, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने केली जाते. यावर आमदार सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, खरा पैलवान हा डावात आल्यावर ढाक लावून समोरच्याला चितपट करतो. तसेच मोदी देखील कधी तरी ट्रम्प यांना ढाक लावतील, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे. नेमके काय म्हणाले होते जयंत पाटील? राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी ट्विट करत केंद्र सरकारच्या सध्याच्या धोरणांवर तसेच मोदींनी काटकसरीच्या दिलेल्या सल्ल्यावर टीका केली होते. ते म्हणाले होते की, देशाच्या पंतप्रधानांनी केलेले प्रत्येक आवाहन मध्यमवर्गीयांनी कर्तव्य म्हणून पाळले. थाळ्या वाजवायला सांगितल्या… वाजवल्या. दिवे लावायला सांगितले तेही लावले. आता युद्धजन्य परिस्थितीत पेट्रोल, डिझेल आणि गॅस कमी वापरण्याचे आवाहन पंतप्रधान महोदयांनी केले आहे. मध्यमवर्गासाठी काटकसर ही काही नवी गोष्ट नाही. त्यामुळे कर्तव्य म्हणून याही वेळेला ते साथ देतीलच. पण 20-30 गाड्यांचा ताफा वापरणाऱ्या मंत्र्यांचे काय? आपल्या राज्यात मुख्यमंत्र्यांपासून मंत्री, अधिकारी आणि हल्ली तर सत्ताधारी पक्षाचे आमदार डझनभर गाड्यांचा ताफा आणि सुरक्षा घेऊन फिरतात, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच पुढे जयंत पाटील म्हणाले, माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस जी, प्रधानमंत्री महोदयांचा आदेश शीर्ष मानून आपणही आपल्यासह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करावी, फक्त एक गाडी आणि एक अंगरक्षक देण्यात यावे. मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच.. पण सत्ताधाऱ्यांनीही राष्ट्र प्रथम हे धोरण कृतीत उतरवावे, ही अपेक्षा, असे पाटील यांनी म्हटले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *