Headlines

दिव्य मराठी एक्स्पोज:प्रा. लोंढेंच्या मारेकऱ्यांना संरक्षण देणाऱ्या पीआय ताटेंच्या निलंबनाची शिफारस, डीसीपींचा चौकशी अहवाल ‘दिव्य मराठी’च्या हाती




सेवानिवृत्त प्रा. राजाभाऊ लोंढे यांचा फेब्रुवारीमध्ये दृश्यम स्टाइलने खून झाला होता. यातील आरोपींना पाठीशी घालत उस्मानपुरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक संग्राम ताटे यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे, हे आरोपी असल्याचे माहिती होऊनही गुन्हा दाखल केला नाही. आरोपी विशाल राठोड व त्याचे साथीदार ६ फेब्रुवारी ते १२ मार्चपर्यंत तब्बल ३६ दिवस पोलिस ठाण्यात येऊन ताटेंना भेटत होते. ही बाब पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी केलेल्या चौकशीतून समोर आली. या चौकशीचा अहवाल ‘दिव्य मराठी’च्या हाती लागला असून यात ताटेंच्या निलंबनाची शिफारस करण्यात आली आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील निवृत्त प्रा. लोंढे यांचा ५ फेब्रुवारी रोजी विशाल राठोड व अन्य दोघांनी खून केला होता. राठोडने प्रा. लोंढे यांना पार्टीसाठी शहराबाहेर बोलावले होते. पार्टीनंतर विशालने प्रा. लोंढे यांचा गोळ्या घालून खून केला. त्यानंतर गेवराई तांडा येथील जंगलात मृतदेह पुरला. घटनेनंतर लोंढेंच्या कुटुंबीयांना संशय येऊ नये, म्हणून राठोडने लोंढेंच्या मोबाइलवर स्टेटस ठेवून तो मोबाइल पुण्यासह अन्य भागांमध्ये फिरवला होता. उस्मानपुरा ठाण्यात आधी ‘मिसिंग’ची नोंद घेण्यात आली होती. नंतर सव्वा महिन्याने खुनाचा गुन्हा दाखल केला. चौकशी गोपनीय, कार्यवाही सुरू ही चौकशी पूर्णपणे गोपनीय आहे. त्यातील निष्कर्षांचा अभ्यास आणि पडताळणी सुरू आहे. गोपनीय असल्याने मी त्यावर काहीही भाष्य करणार नाही. मात्र, त्यावर योग्य कार्यवाही सुरू आहे. – प्रवीण पवार, पोलिस आयुक्त पोलिस निरीक्षक संग्राम ताटे यांनी
या विषयावर बोलणे टाळले या प्रकरणासंदर्भात बाजू जाणून घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संग्राम ताटे यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी सुरुवातीला पूर्णपणे म्हणणे ऐकून घेतले आणि फोन कट केला. पुन्हा लावल्यानंतर त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तसेच त्यांना यासंदर्भात मेसेजही पाठवण्यात आला. मात्र मेसेजलाही त्यांनी उत्तर दिले नाही. त्यामुळे या प्रकरणात त्यांची बाजू नेमकी काय आहे, हे समजू शकले नाही. पोलिस उपायुक्तांच्या चौकशी अहवालातील निष्कर्ष 1 पोलिस निरीक्षक संग्राम ताटे यांनी तात्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करणे आवश्यक होते, ज्यातून खुनासारखा गंभीर गुन्हा घडला आहे. मात्र, ताटे यांनी या गंभीर गुन्ह्याचा प्रकार बर्किंग (दडवण्याचा) करण्याचा प्रयत्न केला.
2 या प्रकरणावरून असे स्पष्ट होते की, संग्राम ताटे यांची आपल्या कामाप्रति असलेली सचोटी संशयास्पद दिसून येत आहे.
3 ताटे हे सातारा ठाण्यात असतानाही त्यांच्याविरोधात कसुरी अहवाल पाठवलेला आहे, ते प्रकरण आणि हे लोंढे खून प्रकरण पाहता ताटे हे ठाणे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यकारी पदावर काम करण्यास सक्षम नाहीत.
4 या प्रकरणामध्ये ताटे यांना निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी करण्याची शिफारस करण्यात येत आहे. लोंढेंच्या कुटुंबीयांचे खच्चीकरण लोंढे यांच्या कुटुंबीयांनी पहिल्याच दिवसापासून विशाल राठोड व त्याच्या मित्रांवर संशय व्यक्त करत त्यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, पोलिसांनी विविध कारणे देत तब्बल एक महिना लोंढेंच्या कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात चकरा मारायला लावल्या. यामुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले होते. सुगावा लागूनही गुन्हा नाही मिसिंगच्या तक्रारीनुसार दोन अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीदरम्यान आरोपी खोटे बोलत असल्याचे स्पष्ट झाले. तरीही ताटेंनी गुन्हा दाखल केलाच नाही. स्वामी यांनी आयुक्तांना सादर केलेल्या अहवालात ‘पोलिस निरीक्षक संग्राम ताटे यांनी खुनासारख्या गंभीर गुन्ह्याचा प्रकार बर्किंग अर्थात दडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ताटे हे ठाणे प्रभारी म्हणून कार्यकारी पदावर काम करण्यास सक्षम नाहीत. त्यांना तात्काळ निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी करावी’ अशी शिफारस अहवालात केली आहे. ‘बर्किंग’मुळे निलंबनाची शिफारस तपास अधिकारी दत्तात्रय बोटके यांनी सीसीटीव्ही फुटेज, सीडीआर, एसडीआरचे विश्लेषण केले. यात लोंढे यांचा घातपात झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बोटके यांनी गुन्हा दाखल करण्याबाबत ताटेंना कळवले. मात्र, गुन्हा दाखल न करता ताटेंनी हा तपास बोटके यांच्याकडून काढून घेत सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी चौरे यांच्याकडे दिला. आरोपींसोबत सतत भेटायचे गुन्हा घडल्यानंतर आरोपी आणि ताटेंच्या ठाण्यामध्येच वारंवार भेटीगाठी झाल्या. आरोपी ताटेंसह त्यांच्या रायटरला वारंवार भेटले. या भेटीच्या स्टेशन डायरीमध्ये कुठेही नोंदी घेण्यात आलेल्या नाहीत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *