Headlines

पालघरमध्ये वऱ्हाडींचा ट्रक अन् कंटेनरची धडक:12 जणांचा मृत्यू, 20 ते 25 गंभीर जखमी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना




मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रविवारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक अपघाताची घटना घडली आहे. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी वऱ्हाडी घेऊन जाणाऱ्या एका आयशर ट्रकची आणि कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात १२ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर २० ते २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची भीषणता पाहता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे लग्नघरातील आनंदाच्या वातावरणावर विरजण पडले असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, डहाणू तालुक्यातील बापूगाव येथून आयशर ट्रकमधून १०० पेक्षा जास्त वऱ्हाडी एका साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. सर्वजण आनंदाच्या वातावरणात प्रवासाचा आनंद घेत असतानाच, पालघर जिल्ह्यातील धानीवरी गावाजवळ ही दुर्घटना घडली. भरधाव वऱ्हाड्यांचा ट्रक आणि समोरून येणाऱ्या कंटेनरमध्ये अत्यंत जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, धडकेनंतर आयशर ट्रक आणि कंटेनर दोन्ही वाहने रस्त्यावरच पलटी झाली. मृत आणि जखमींमध्ये महिला व लहान मुलांचा समावेश या भीषण अपघातात ट्रकचा चक्काचूर झाला असून आत बसलेले वऱ्हाडी खाली चेपले गेले. प्राथमिक माहितीनुसार, आतापर्यंत १२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये आणि गंभीर जखमी झालेल्यांमध्ये महिला तसेच निष्पाप लहान मुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. अपघात होताच महामार्गावर आरडाओरडा आणि किंकाळ्यांनी परिसर हादरून गेला होता. जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ट्रकमध्ये अडकलेल्या जखमींना नागरिकांच्या मदतीने बाहेर काढून तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने डॉक्टरांचे पथक युद्धपातळीवर उपचार करत आहे. भरधाव वेग आणि निष्काळजीपणामुळे अपघात? या भीषण अपघातामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला सारून काही वेळात वाहतूक पूर्ववत केली. हा अपघात नेमका कसा झाला, याचे अचूक कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी प्राथमिक अंदाजानुसार वाहनाचा भरधाव वेग आणि चालकाचा निष्काळजीपणा यामुळे हा अपघात झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. कासा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *