![]()
पुणे विद्यापीठात ‘वंदे मातरम् कृती समिती, पुणे’तर्फे ‘यूथ की आवाज’ या विशेष सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परिसर देशभक्तीपर गीतांच्या सुरांनी आणि ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने दुमदुमून गेला. या कार्यक्रमाला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या “छात्रो की गुंज” कार्यक्रमाला विरोध करत भाजपने या कार्यक्रमाचे आयोजन करत प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम् के सन्मान में, देश का युवा मैदान में’ अशा घोषणांनी परिसर निनादून गेला. ‘जिंदगी मौत ना बन जाए’, ‘सुनो गौर से दुनियावालों’, ‘कोई कहे कहता रहे’, ‘जय हो’, ‘जय जय जय महाराष्ट्र माझा’, ‘शूर आम्ही सरदार’, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ यांसारख्या देशभक्तीपर आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला साद घालणाऱ्या गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’च्या इतिहासाचेही स्मरण करण्यात आले. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘आनंदमठ’ कादंबरीतून समोर आलेल्या या गीताला दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्यलढ्यात या गीताने महत्त्वपूर्ण योगदान दिले. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी १८९६मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात हे गीत गायले होते, त्यानंतर ते स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणागीत बनले. कार्यक्रमाच्या समारोपावेळी मैदानातील दिवे मंद करण्यात आले. हजारो मोबाइलचे फ्लॅशलाईट्स एकाच वेळी सुरू होताच विद्यापीठाच्या मैदानावर नक्षत्रांचे आभाळ अवतरल्याचा अनुभव आला. युवकांनी हातात मोबाइलची प्रकाशज्योत घेऊन आणि ओठांवर ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन केले. विकसित भारताच्या निर्मितीसाठी योगदान देण्याचा संकल्प करत या स्वरसंध्येची सांगता झाली. केंद्रीय नागरी वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या कार्यक्रमातील युवकांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, “आज देशभक्त युवा संपूर्ण ‘वंदे मातरम्’ म्हणणार आहेत. आपण संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून ‘वंदे मातरम्’ म्हणतो. मात्र, काँग्रेसमधील काही लोकांनी संपूर्ण ‘वंदे मातरम्’ म्हणण्याला विरोध केला. त्यांनी देशाची,क्रांतिकारकांची आणि स्वातंत्र्यासाठी लढलेल्या थोर व्यक्तींची माफी मागितली पाहिजे. संविधानाचीही माफी मागितली पाहिजे.राष्ट्रभक्त युवक संपूर्ण ‘वंदे मातरम्’ म्हटल्याशिवाय राहणार नाहीत. काँग्रेसला हे दाखवून देऊ.आपण देशाची ताकद आणि शक्ती आहात.आम्ही आपल्या सोबत आहोत.” भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी काँग्रेसच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावर टीका केली. ते म्हणाले, “लाखो रुपयांची बॅनरबाजी आणि पैशांच्या जोरावर गर्दी जमवून विद्यार्थ्यांच्या नावावर राजकारण करणाऱ्या काँग्रेसचा हा प्रयत्न आहे. शिक्षणाच्या मंदिरात दहशत, हुकूमशाही आणि पेड पीआर खपवून घेतला जाणार नाही. मतभेद असतील तर समोरासमोर येऊन चर्चा करा, काँग्रेसने विद्यार्थ्यांच्या आडून राजकारण करू नये.”
Source link
पुणे विद्यापीठात 'वंदे मातरम्'चे सामूहिक गायन:युवाशक्तीने चेतवली देशभक्तीची ज्योत, 'यूथ की आवाज' कार्यक्रमाचे आयोजन