![]()
राज्यात ३० जूनपासून सुरू झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाला बागलाण तालुक्यात प्रारंभ झाला असून, तालुक्यातील तब्बल ३,००,१७९ मतदारांची घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे. यासाठी २८८ बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) व २८८ बीएलओ सहाय्यक नियुक्त करण्यात आले असून त्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात कामाला सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत ३० जून रोजी सटाणा येथील डिव्हाईन विद्यालयात बीएलओंना प्रशिक्षण देण्यात आले. सर्व अधिकारी आपल्या मतदान केंद्र क्षेत्रात जाऊन शंभर टक्के मतदारांची पडताळणी करणार असून, मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येक मतदाराकडून आवश्यक फॉर्म भरून घेतले जाणार आहेत. फॉर्म न भरणाऱ्या किंवा दिलेल्या पत्त्यावर न आढळणाऱ्या मतदारांची वारंवार भेट घेऊन खातरजमा करण्यात येणार आहे. त्यानंतरही आवश्यक पुरावे सादर न करणाऱ्या किंवा उपलब्ध न होणाऱ्या मतदारांची नावे नियमानुसार मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.या उपक्रमासाठी मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी महेश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार कैलास चावडे तसेच गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, विविध विभागांचे उपविभागीय अभियंते आणि महिला व बालविकास अधिकारी यांची सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. हा विशेष कार्यक्रम ७ ऑक्टोबरपर्यंत चालणार असून, या कालावधीत फॉर्मचे वितरण, संकलन, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी गरजेची आहे. बीएलओ घरी आल्यानंतर त्यांना आवश्यक माहिती व कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून द्यावीत. तसेच घरातील सर्व पात्र मतदारांचे फॉर्म भरून घ्यावेत. सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींनीही या मोहिमेत बीएलओंना सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी महेश शेलार यांनी केले आहे.
Source link
बागलाणमध्ये 3 लाख मतदारांची होणार पडताळणी:288 बीएलओ व 288 सहाय्यक नियुक्त; 7 ऑक्टोबरपर्यंत राबवणार उपक्रम