Headlines

बागेश्वर बाबांच्या दरबारात माजी सरन्यायाधीश!:भूषण गवईंच्या भेटीने चर्चांना उधाण; धीरेंद्र शास्त्रींसोबत अर्धा तास चर्चा




भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नुकतीच मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध बागेश्वर धामला कुटुंबासह भेट दिली आहे. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामुळे बागेश्वर धाम पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एका सर्वोच्च घटनात्मक पदावर राहिलेल्या व्यक्तीने या श्रद्धास्थानाला भेट दिल्याने या दौऱ्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. ‘बागेश्वर बाबा’ म्हणून प्रसिद्ध असलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे त्यांच्या ‘दरबार’ आणि धार्मिक प्रवचनांमुळे सध्या देशभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. भक्तांच्या समस्यांवर आध्यात्मिक उपाय सुचवण्याच्या दाव्यामुळे त्यांच्या कार्यक्रमांना भाविकांची प्रचंड गर्दी होत असली तरी, त्यांच्या कथित चमत्कारांवरून अनेकदा वादही निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, समाजात अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर सातत्याने एक नवा वैचारिक संघर्ष आणि चर्चा होत असते. बागेश्वर बालाजीचे दर्शन या ठिकाणी आता भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई कुटुंबासह गेल्याने चर्चेला नवे कारण मिळाले आहे. बागेश्वर धामच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. तसेच त्यांच्या भेटीचे फोटोही ट्विट करण्यात आले आहेत. बागेश्वर धामने ट्विट केले की, सोमवारी सायंकाळी भूषण गवई यांनी पत्नी तेजस्विनी गवई आणि पुत्र ज्योतिरादित्य गवई यांच्यासह धामला भेट दिली. यावेळी त्यांनी बागेश्वर बालाजीचे दर्शन घेऊन पूजा-अर्चा केली. धीरेंद्र शास्त्री यांच्यासोबत आध्यात्मिक चर्चा बागेश्वर बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर भूषण गवई यांनी आपल्या कुटुंबासह बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेतली. यावेळी शास्त्री यांनी त्यांना बालाजी भगवानांचे पवित्र चित्र भेट म्हणून दिले आहे. यावेळी सुमारे अर्धा तास गवई आणि धीरेंद्र शास्त्री यांच्यात आध्यात्मिक विषयावर चर्चा झाल्याचे समजते. भूषण गवई यांनी यापूर्वीही दिली धामला भेट भूषण गवई यांनी या भेटीदरम्यान बागेश्वर धाममधील गुरुकुल तसेच राबवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांची आत्मीयतेने माहिती घेऊन त्यांचे कौतुक केले. श्रद्धा आणि समाजसेवा यांचा सुंदर समन्वय त्यांनी यावेळी अधोरेखित केला. विशेष म्हणजे, हा त्यांचा पहिलाच दौरा नसून, पदावर असतानाही त्यांनी यापूर्वी अनेकदा येथे भेट दिली आहे, ज्यामुळे या क्षेत्राप्रती असलेली त्यांची सातत्यपूर्ण आणि दृढ श्रद्धा पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. मात्र सध्या महाराष्ट्रात सुरू असलेले खरात प्रकरण आणि अंधश्रद्धा यामुळे गवई यांनी घेतलेली धीरेंद्र शास्त्री यांची भेट यावरून वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *