![]()
तालुक्यातील मंगरूळ कांबे ते शेलू या मुख्य पाणंद रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला असून जागोजागी पाण्याचे डबके साचले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या स्वतःच्या शेतात जाणेही कठीण झाले असून, खरीप हंगामाची पेरणी व मशागतीसाठी लागणारे बियाणे, खते आणि इतर शेती साहित्य वाहून नेण्यास मोठा अडथळा निर्माण झाला आहे. शासनाकडून पाणंद रस्त्यांच्या विकासासाठी आणि खडीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असल्याचा मोठा गाजावाजा केला जातो. मात्र, प्रत्यक्षात अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असल्याने “हा निधी नेमका कुठे जिरला?’ असा संतप्त प्रश्न स्थानिक शेतकरी उपस्थित करीत आहेत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या संवेदना बोथट झाल्या असून त्यांना शेतकऱ्यांच्या मरणयातनांशी काहीही देणेघेणे नसल्याचे विदारक चित्र येथे पाहायला मिळत आहे. आर्थिक नुकसानीची भीती : सध्या पावसाळा सुरू झाल्याने शेतात पेरणी आणि वाईफेरीची (कोळपणी) कामे कशी करावी, या विवंचनेत शेतकरी अडकला आहे. पेरणीचा योग्य काळ निघून गेल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे. शासनाच्या विविध योजनांमधून पांदण रस्ते मोकळे करणे व त्यांचे खडीकरण करण्याचे स्पष्ट आदेश असतानाही तालुका प्रशासनाने या संवेदनशील विषयाकडे पूर्णपणे डोळेझाक केली आहे. वर्षानुवर्षांचा संघर्ष ठरतोय निष्फळ : मंगरूळ कांबे आणि शेलू परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांची शेतजमीन याच मार्गावर आहे. दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त होते. गुडघाभर चिखल, पाण्याचे साचलेले डोह आणि चाके रुतल्यामुळे पडलेले खोल खड्डे यामुळे बैलगाडी किंवा ट्रॅक्टर नेणे तर दूरच, साधे पायी चालणेही अशक्य झाले आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिक शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींपासून ते प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत अनेकवेळा लेखी निवेदने दिली, आंदोलने केली. परंतु प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे हा रस्ता केवळ कागदावरच राहिला आहे. ^ निवडणुका आल्या की लोकप्रतिनिधी येतात, पाहणी करतात आणि रस्त्याचे खडीकरण करण्याचे आश्वासन देऊन निघून जातात. पण प्रत्यक्ष पावसाळा आला की आमच्या नशिबीगुडघाभर चिखल येतो. शेतात खते न्यायची कशी आणि पेरणी करायची कशी, याचे उत्तर आता प्रशासनानेच द्यावे. – नामदेव खांडेकर, मंगरूळ कांबे परिसर. दुरवस्थेमुळे शेतीवर होणारे परिणाम चिखलामुळे ट्रॅक्टर किंवा बैलगाडी रस्त्यातच रुतत असल्याने खते व बियाणे शेतापर्यंत पोहोचवणे अशक्य झाले आहे. योग्य वेळी वाईफेरी (कोळपणी) सारखी महत्त्वाची कामे झाली नाहीत, तर पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होणार आहे. लोकप्रतिनिधींची शेती असलेल्या भागाकडे चकाचक डांबरी रस्ते बनवले जातात, मात्र गरीब शेतकऱ्यांच्या पाणंद रस्त्यांना जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. निवडणुकीत आश्वासने, पावसाळा आला की चिखल
Source link
मंगरूळ कांबे-शेलू पाणंद रस्ता चिखलात; मशागतीसाठी अडचण:रस्त्यांचा गाजावाजा मोठा; शेतकऱ्यांच्या नशिबी मात्र पाणंद वाटा