Headlines

मोशी कचरा डेपो दुर्घटना:आतापर्यंत 9 जणांची सुटका, एकाचा मृत्यू; 2 दिवसांनंतरही कचऱ्याखाली दबलेल्या 8 जणांचा शोध सुरूच




पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपोत झालेल्या भीषण दुर्घटनेला आता दोन दिवस उलटून गेले असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी अद्यापही युद्धपातळीवर मोहीम सुरू आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि अग्निशमन दलाच्या पथकाने आतापर्यंत ९ कर्मचाऱ्यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले आहे. मात्र, या दुर्घटनेत एका कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, अजूनही ८ कर्मचारी कचऱ्याच्या महाकाय ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती आहे. दोन दिवस उलटूनही या ८ जणांचा कोणताही सुगावा न लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली असून, बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचा जीव टांगणीला लागला आहे. ४८ तासांनंतरही रेस्क्यू ऑपरेशन सुरूच माहितीनुसार, मोशी कचरा डेपोमध्ये कचऱ्याचा भलामोठा डोंगर कोसळून झालेल्या या भीषण दुर्घटनेनंतर यंत्रणा सतर्क झाली आहे. काल दुपारपासून सुरू असलेले रेस्क्यू ऑपरेशन आज दुसऱ्या दिवशीही अखंडपणे सुरू आहे. कचऱ्याचा ढिगारा प्रचंड मोठा आणि खोल असल्याने शोधकार्यात बचाव पथकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि श्वानपथकाच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. ९ जणांची सुटका, एकाचा दुर्दैवी अंत आतापर्यंत ढिगाऱ्याखालून ९ जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यापैकी एका कर्मचाऱ्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे मोशी परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. ८ जणांच्या शोधासाठी शर्थीचे प्रयत्न; नातेवाईकांचा आक्रोश दुर्घटनेला दोन दिवस पूर्ण झाले तरी अद्याप ८ कर्मचाऱ्यांचा शोध लागलेला नाही. ढिगाऱ्याखाली जसजसा वेळ वाढत आहे, तसतशी काळजी अधिक गडद होत चालली आहे. कचरा डेपोच्या आवारात बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली असून, आपल्या माणसांच्या सुरक्षेसाठी त्यांचा आक्रोश सुरू आहे. प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जोपर्यंत शेवटचा व्यक्ती बाहेर निघत नाही, तोपर्यंत हे शोधकार्य थांबणार नाही. संभाजीनगरचा महेश कुंभार मोशीतील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकला: चमत्कार घडावा अन् माझा भाऊ जिवंत असावा; संतोष कुंभारची भावना मोशीतील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली महेश कुंभार अडकला आहे. ३२ वर्षीय महेश मूळचा छत्रपती संभाजीनगरचा. एमबीएचं शिक्षण घेतल्यावर तो वेस्ट एनर्जी प्रकल्पात वर्षभरापासून एचआर म्हणून नोकरीस लागला. दुर्घटनेत महेश इमारतीत अडकल्याचे त्याच्या कुटुंबीयांना मध्यरात्री दीड वाजता कंपनीकडून कळवण्यात आले. तेव्हापासून महेशशी संपर्क साधण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, तो होऊ शकला नाही. त्यानंतर महेशचा भाऊ संतोष कुंभार तातडीने घटनास्थळी पोहोचला. आपला भाऊ सुरक्षित असेल, या विचारात तो आला, पण महेश इमारतीत अडकून असल्याचे त्याला सांगण्यात आले. आता काहीतरी चमत्कार घडेल आणि आपला भाऊ जिवंत असेल, असं संतोषला वाटतंय. आधी सहा, नंतर तिघांना बाहेर काढले इमारत कोसळताच अशोक गुप्ता, मुनेंद्र कुमार, चंद्रशेखर सिंह, दिनेश सुतार आणि श्री बाला बाहेर पडले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, भारतीय सेना, पिंपरी-चिंचवड मनपा अग्निशमन विभाग, पीएमआरडीए अग्निशमन दल आणि पोलिसांनी बचावकार्य सुरू केले. बुधवारी रात्री आधी सोमनाथ शेळके, सचिन दवडगाव, दादासाहेब आरडे, सुजाता शिंदे, रामप्रताप चव्हाण आणि रणवीर सिंह व त्यानंतर विजय सपकाळ, भूषण पाटील आणि महेश राऊत यांना बाहेर काढण्यात आले. दरम्यान, महेश कुंभार, ⁠सनी माने, राहुल गायकवाड, ⁠सुनील कोरके, ⁠अक्षय सावंत,⁠रणजीत पाटील, ⁠नागेश गायकवाड आणि ⁠वामन कसबे हे ढिगाऱ्याखाली अडकले. दरडीसारखा कचऱ्याचा डोंगर पडल्याने लगेच कुणाला दोषी धरता येणार नाही मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी मनपा आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी धक्कादायक वक्तव्य केले. ते म्हणाले की, ज्याप्रकारे नैसर्गिक आपत्तीमध्ये दरड पडते त्याच पद्धतीने कचऱ्याचा डोंगर इमारतीवर पडल्याने ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये लगेच कुणाला दोषी धरता येणार नाही. इमारत कचऱ्याच्या ढिगाऱ्यापासून ३० मीटर अंतरावर असल्याने तिला संरक्षक भिंत बांधण्याची गरज वाटली नाही. निकष पालन करूनच इमारत बांधकाम झाले होते. येथे १९८२ पासून रोज १३०० ते १४०० मेट्रिक टन कचरा वर्गीकरण करून त्याचे वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात प्रक्रिया करण्यात येत होती. अनेक वर्षांपासून कचरा साचल्याने डोंगर निर्माण झाला. हा डोंगर पडेल अशी शक्यता आम्हाला वाटली नव्हती. तीन दिवसांच्या पावसाने ही दुर्घटना घडली. खासदार बारणे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने तीन वर्षांपूर्वी उद्घाटन झालेल्या मोशी कचरा डेपो वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाला केंद्र सरकारने १३५० कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. येथील इमारत नियमानुसार उभारली आहे का, याची चौकशी करावी. दोषी अधिकारी, ठेकेदारांवर कारवाई व्हावी. प्राण गमावलेल्याच्या कुटुंबातील एका सदस्याला मनपात नोकरी मिळावी. ज्येष्ठ नगरसेविका सुलभा उबाळे म्हणाल्या की, या दुर्घटनेची एसआयटीमार्फत चौकशी केली जावी. कचऱ्याच्या डोंगराची उंची जास्तीत जास्त २० मीटर ठेवता येते. परंतु येथे ३० मीटरपेक्षा अधिक उंचीचा डोंगर आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *