![]()
२,१४३ कोटी रुपये गैरमार्गाने देशाबाहेर पाठवल्याप्रकरणी अटकेतील सीए श्याम कलानी हा एकमेव नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशभरातील असे ७ सीए आयकर विभागाच्या रडारवर आहेत. उदगीरपाठोपाठ अन्य ठिकाणीही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. कलानीच्या मदतीने १६ कंपन्यांमार्फत सिंगापूर, मलेशिया, अमेरिका अशा देशांमध्ये रक्कम वळवण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, अस्तित्वात नसलेल्या १६ कंपन्यांना कोट्यवधी रुपये परदेशात पाठवण्यासाठी सीए श्याम कलानी याने ‘१५ सीबी’ प्रमाणपत्र तयार करून दिले. ते प्रमाणपत्र तयार करण्यासाठी वापरलेले इलेक्ट्रॉनिक गॅजेट गायब असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा गुन्हा ज्या १५ सीबी प्रमाणपत्रावर आधारित आहे, ते कसे बनवले याचे पुरावेच नष्ट करण्यात आल्याची शंका आहे. जेव्हा भारतातील एखादी व्यक्ती किंवा कंपनी विदेशात पैसे पाठवते, तेव्हा त्यावर योग्य कर आकारणी झाली आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी १५ सीबी हे प्रमाणपत्र सीएमार्फत दिले जाते. परदेशात कोट्यवधी रुपये पाठवण्यासाठीच या १६ कंपन्या कागदोपत्री स्थापन करण्यात आल्या. गेल्या ८ दिवसांच्या झाडाझडतीत यापैकी तीन कंपन्या नोंदणी केलेल्या पत्त्यावर नसल्याचे आयकर विभागाच्या पथकाला आढळले होते. त्यामुळे केवळ पैसे फिरवण्यासाठी या कंपन्यांची नोंदणी करण्यात आल्याची शंका तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सीए कलानी याने पाठवलेले पैसे ज्या बॅँकांमार्फत परदेशात गेले त्या बॅँकाही चौकशीच्या रडारवर आल्या आहेत. उदगीर न्यायालयाने सीए कलानी याला ९ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सरकारतर्फे ॲड. के. टी. उगलमुगले यांनी काम पाहिले. न्यायालयात कुटुंबियांना पाहून कलानी भावूक सीए कलानीला अटक केल्यानंतर सोमवारी दुपारी उदगीरच्या न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. मुळचा कर्नाटकातील खेर्डा येथील रहिवासी असलेल्या कलानीची पत्नी, आई, वडील व अन्य नातेवाईक कोर्टात हजर होते. यावेळी कलानी भावून झाला. २०२१ मध्ये सीए झालेल्या कलानीचा आणखी एक भाऊ पुण्यात सीए आहे. तीन कंपन्यांनी ७४३ कोटी विदेशात पाठवले प्राथमिक तपासात इन्फोसेक आयटी इंडिया प्रा.लि., डेव्हलोपस्कोप सॉफ्टवेअर सोल्युशन्स आणि कॅल्कॉन कम्युनिकेशन्स या तीन कंपन्यांनी कागदोपत्री दाखवलेले पत्ते बोगस असल्याचे समोर आले आहे. सीए कलानी याच्या माध्यमातून या तीन कंपन्यांनी ७४३ कोटी ४२ लाख १४ हजार ४२७ रुपये परदेशात पाठवले. प्राथमिक तपासातील निष्कर्षांच्या आधारे अन्य १३ कंपन्यांचे पत्तेही बोगस असावा, असा संशय आहे. या सर्व कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांची व परदेशात पाठवलेल्या रकमेची तपास यंत्रणांकडून पडताळणी केली जात आहे.
Source link
कलानीला 9 दिवसांची कोठडी:उदगीरच्या कलानीसोबत 7 सीए रडारवर; 15 सीबी प्रमाणपत्राचे गॅजेटही गायब