Headlines

बारामतीत सांगता सभेची रणधुमाळी:देवेंद्र फडणवीस येणार, शरद पवारांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह; सुनेत्रा पवार यांनी सांगितले कारण




बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून आज महायुतीकडून सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ भव्य सांगता सभा पार पडणार आहे. या सभेसाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ही निवडणूक होत असल्याने संपूर्ण बारामतीत भावनिक वातावरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आजची सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सभेपूर्वी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी सकाळी सभास्थळाची पाहणी केली. यावेळी सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, दादांच्या आठवणी बारामतीच्या प्रत्येक कोपऱ्यात आहेत आणि लोकांच्या भावनांमधून त्या स्पष्टपणे जाणवतात. आजच्या सभेत सर्व प्रमुख नेते सहभागी होणार असून पवार कुटुंबातील अनेक सदस्यही उपस्थित राहतील, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र, शरद पवार यांच्या उपस्थितीबाबत अनिश्चितता व्यक्त करत त्यांनी सांगितले की, त्यांची प्रकृती सध्या ठीक नसल्याने त्यांचा अजून कोणताही संदेश मिळालेला नाही. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, रामदास आठवले, उदय सामंत आणि खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थिती अपेक्षित आहे. त्यामुळे या सभेला केवळ स्थानिकच नव्हे, तर राज्यभरातून राजकीय लक्ष लागले आहे. सभास्थळी अजित पवार यांच्या आठवणी जागवणारे फोटो आणि फलक लावण्यात आले असून, ते पाहून कार्यकर्ते भावूक होत असल्याचे चित्र आहे. बारामतीतील ही पोटनिवडणूक अजित पवार यांच्या निधनामुळे जाहीर झाली आहे. 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर निर्माण झालेल्या रिक्त जागेसाठी ही निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार मैदानात असून काँग्रेसने सुरुवातीला आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, नंतर त्यांनी माघार घेतली. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही उमेदवारी दाखल केली नाही. तरीही सुनेत्रा पवार यांच्या विरोधात 22 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित मानला जात असला, तरी मताधिक्य किती मिळते, यावर सर्वांचे लक्ष आहे. आतापर्यंत अजित पवार यांनी बारामतीत विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यामुळे तोच रेकॉर्ड मोडण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. याबाबत बोलताना पार्थ पवार यांनी मतदारांना मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, विजय निश्चित असला तरी मताधिक्य वाढवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सभेला विशेष महत्त्व एकूणच, बारामतीतील आजची सांगता सभा ही केवळ प्रचाराचा शेवट नसून भावनिक आणि राजकीय शक्तीप्रदर्शनाचा मोठा मंच ठरणार आहे. दादांच्या आठवणी, नेत्यांची उपस्थिती आणि मताधिक्याचा मुद्दा या सर्व गोष्टींमुळे या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आता या सभेनंतर मतदानाच्या दिवशी मतदार काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *