Headlines

भंडारा जिल्ह्यात नेरला सिंचन योजनेचे पाणी कालव्यात:शेतकऱ्यांच्या मागणीनंतर दुष्काळग्रस्त धान पिकांना दिलासा




भंडारा जिल्ह्यात जून-जुलै महिन्यातील पावसाच्या तीव्र ओढीमुळे धोक्यात आलेल्या धान पिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनंतर नेरला उपसा सिंचन योजनेचे पाणी मंगळवार, १४ जुलै रोजी मुख्य कालव्यात सोडण्यात आले. यामुळे रखडलेली शेतीकामे पुन्हा सुरू झाली असून, सुकणाऱ्या पिकांना जीवनदान मिळाले आहे. पावसाच्या अभावामुळे परिसरातील धान पिकांची लागवड धोक्यात आली होती. पेरणी केलेली पिके करपण्याच्या मार्गावर होती, तर रोवणीची कामे पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत होते. या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांनी एकत्र येत पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून सिंचन विभागाकडे नेरला उपसा सिंचन योजनेचे पाणी तत्काळ सोडण्याची मागणी केली होती. पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी आणि गोंडवाना विद्यापीठाच्या प्रतिनिधींनी उपविभागीय व कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन त्यांना शेतातील वास्तविक परिस्थितीची माहिती दिली. या निवेदनानंतर सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत पाणी सोडण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणींवर मात करत २४ तासांच्या आत कालव्यात पाणी प्रवाहित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाणी आल्याची बातमी समजताच शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत. वरिष्ठ कृषी विद्यावेत्ता डॉ. सतीश पाटील यांनी या निर्णयाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “धान हे अत्यंत संवेदनशील आणि जास्त पाणी लागणारे पीक आहे. सुरुवातीच्या काळात रोवणी लांबल्यास किंवा पिकाला वेळेत पाणी न मिळाल्यास, पिकाची वाढ खुंटते आणि उत्पादनात थेट ४० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते.” “पावसाने ओढ दिली असताना नेरला सिंचन कालव्यातून वेळेत पाणी सोडण्याचा निर्णय अत्यंत योग्य ठरला. यामुळे केवळ पिकांना जीवनदान मिळाले नाही, तर संपूर्ण भंडारा परिसरातील ग्रामीण कृषी अर्थव्यवस्थेला होणाऱ्या मोठ्या आर्थिक नुकसानीपासून वाचवले आहे,” असेही डॉ. पाटील यांनी नमूद केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *