![]()
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. सायंकाळी 5 वाजता राज्यसभेचे सभापती सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतल्यानंतर सुनेत्रा पवार त्यांचा राजीनामा देणार असल्याचे समजते. यासाठी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. आता सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटातून कोणाला संधी मिळणार याची चर्चा सुरू असून यात मंत्री छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. सुनेत्रा पवारांच्या खासदारकीच्या राजीनाम्यानंतर कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागलेले असताना काही नावे चर्चेट आहेत. त्यात जय पवार, छगन भुजबळ आणि नितीनकाका पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. या तिघांच्या नावातून छगन भुजबळ यांच्याच नावाची अधिक चर्चा होताना दिसत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. छगन भुजबळ यांना राज्यसभेवर जाण्याची इच्छा होती. मात्र त्यांना डावलून सुनेत्रा पवारांना खासदारकी देण्यात आली होती. त्यावेळी भुजबळ नाराज असल्याचेही समोर आले होते. त्यामुळे आता त्यांना राज्यसभेची खासदारकी देत तेव्हाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. जय पवारांचेही नाव चर्चेत तर दुसरीकडे जय पवारांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे. त्यांना विधान परिषदेवर पाठवून आमदार करण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र पक्षाने झिशान सिद्दिकी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे आता त्यांना राज्यसभेवर पाठवले जाणार का? असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. असे जर झाले तर पार्थ पवार यांच्यासह जय पवार देखील सभागृहात पाहायला मिळतील. नितीनकाका पाटलांना अजित पवारांनी दिला होता शब्द दरम्यान, तिसरे नाव चर्चेत आहे ते म्हणजे नितीनकाका पाटील यांचे. सातारा लोकसभा मतदारसंघातील वाई विधानसभा मतदारसंघात प्रचारसभेत बोलताना अजित पवार यांनी नितीनकाका पाटील यांना राज्यसभेचे खासदार करण्याचा शब्द दिला होता. त्यामुळे आता अजित पवारांच्या अनुपस्थितीत पक्षाकडून हा शब्द पाळला जाणार का? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
Source link
मंत्रिपद सोडून छगन भुजबळ राज्यसभेत जाणार का?:सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर भुजबळांच्या नावाची चर्चा; भूमिकेकडे सर्वांचे लक्ष