Headlines

मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप:मंत्र्याकडून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न, अभिनेते विजय पाटकरांचा आरोप




अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी निवडणुकीत कलाकार, विचारसरणी आणि संघटनशक्तीची खरी लढाई रंगणार असल्याची चर्चा असतानाच, आता या निवडणुकीला राजकीय वळण लागल्याचे चित्र समोर आले आहे. महामंडळाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी निवडणुकीतील अंतर्गत राजकारणावर जाहीर नाराजी व्यक्त करत थेट एका मंत्र्यांच्या ओएसडीवर गंभीर आरोप केले आहेत. “राजकारण करून काही लोकांनी माझा उमेदवारी अर्ज कोल्हापूरला भरूच दिला नाही,” अशी खंत विजय पाटकर यांनी व्यक्त केली. मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीच्या मुख्य प्रक्रियेला आता वेग आला असून २५ मे २०२६ रोजी उमेदवारांची प्राथमिक यादी प्रसिद्ध केली जाईल आणि याच दिवशी अर्जांची रीतसर छाननी केली जाणार आहे. २६ ते २८ मे दरम्यान उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. २९ मे रोजी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करून निवडणूक चिन्हांचे अधिकृत वाटप केले जाईल. ७ जून तीन प्रमुख केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान पार पडेल. ८ जून रोजी मतमोजणी होऊन अंतिम निकाल घोषित केला जाईल. या निवडणुकीदरम्यान विजय पाटकर यांनी खळबळजनक आरोप केलेत. मंत्र्यांच्या ओएसडीचा कोल्हापुरात ठिय्या आपली व्यथा मांडताना अभिनेते विजय पाटकर म्हणाले की, चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मी उमेदवारी अर्ज भरून कोल्हापूरला पाठवला होता. मात्र, तिथे राजकीय दबाव आणून तो दाखल करू दिला गेला नाही. एका बड्या मंत्र्यांचा ओएसडी गेल्या चार दिवसांपासून कोल्हापुरात ठाण मांडून बसला आहे आणि तो मतदारांवर, कलाकारांवर प्रचंड दबाव आणत आहे. कोल्हापुरात बसून ‘हा व्यक्ती नको आणि तो व्यक्ती नको’ अशी फतवेबाजी हा ओएसडी करत आहे. या मंत्र्यांची आणि त्यांच्या ओएसडीची विधानभवनातील सगळी कामे संपली आहेत का, जेणेकरून ते चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत रस घेत आहेत? असा बोचरा सवाल विजय पाटकरांनी उपस्थित केला. कर्मचाऱ्यांचे पगार रखडवले, महामंडळाचे थडगे केले! विजय पाटकर यांनी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या कार्यपद्धतीवर अत्यंत तीव्र शब्दांत आक्षेप घेतला. ते म्हणाले, “मेघराज भोसलेला लाज वाटायला पाहिजे, त्याने मागील १० वर्षांत महामंडळाचे अक्षरशः थडगे करून ठेवले आहे. महामंडळातील कर्मचाऱ्यांचे तब्बल ७ महिने पगार देखील दिले गेले नाहीत. असे उद्योग करून तो उलट मला फोन करतो आणि त्याच्या पॅनेल मधून उभे राहण्याची गळ घालतो. मी काय माती खाल्ली आहे का, जो त्याच्या पॅनेल मधून उभा राहीन?” राजकारण्यांनी महामंडळात कशाला हस्तक्षेप करायला हवा? विजय पाटकर म्हणाले, “आम्ही मागील ४० वर्षांपासून या इंडस्ट्रीत प्रामाणिकपणे काम करत आहोत. आम्ही कलाकार कधी राजकारण्यांकडे जात नाही, मग या राजकारण्यांनी आमच्या महामंडळात कशाला हस्तक्षेप करायला हवा? मी स्वतंत्र पॅनेल उभा करेन या भीतीनेच माझा अर्ज भरू दिला गेला नाही. जर माझ्या जागी नीलम शिर्के अध्यक्ष होत असतील तर नक्की होऊ दे, त्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरतील. ती माझी चांगली मैत्रीण आहे, तिला माझा पाठिंबा असेल.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *