![]()
भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमधील असमान्वयमुळे तहकूब झालेली व त्यानंतर विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडलेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला दीड महिना उलटूनही अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे भाडेकरू दराने घरपट्टीचे मूल्यांकन रद्द करण्यासह व्यापारी संकुले व भुयारी गटार योजनेसाठी कर्ज, रस्त्यासाठी भूसंपादन आदी विषयांवरील निर्णयही रखडले आहेत. भाडेकरू दराने घरपट्टी, गॅस पाइपलाइन खोदाई, कर्ज प्रस्ताव व भूसंपादन आदी महत्वाच्या विषयावर १५ मे रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. या सभेतील विषयांबाबत विश्वासात न घेतल्याने भाजपकडून सभेला न जाण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवकही सभेकडे फिरकले नाहीत. युतीचा एकही नगरसेवक सभेला न आल्याने महापौर ज्योती गाडे यांनी सभा अनिश्चित काळासाठी तहकूब केली. दरम्यानच्या काळात विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने ही सभा लांबणीवर पडली होती. आचारसंहिता शिथिल झाल्याने ही सभा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, अद्यापही सभेसाठी हालचाली होताना दिसून येत नाही. भुयारी गटार योजना, व्यापारी संकुलाच्या उभारणीसाठी कर्ज घेण्याच्या प्रस्तावाची माहिती न दिल्याने व विश्वासात न घेतल्याने भाजपने नाराजी व्यक्त केली होती. त्यातूनच भाजप नगरसेवकांनी सभेकडे पाठ फिरवली व परिणामी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीही सभेला जाणे टाळले होते. याला दीड महिना लोटला तरीही कर्ज घेण्याच्या विषयावरून भाजप व राष्ट्रवादी युतीत एकमत झालेले नाही. भुयारी गटार योजनेसाठी कर्जाच्या विषयावर मतमतांतरे असल्याने सभा घेण्यात आली नाही.
Source link
महापालिकेच्या तहकूब सभेला मुहूर्त मिळेना:घरपट्टीचा निर्णयही रखडला