![]()
राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतलेला कर्जमाफीचा निर्णय मोठा दिलासा देणारा असल्याचे सांगत मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजना, पावसाची परिस्थिती, महायुतीतील खातेवाटप, जयंत पाटील यांच्या भेटीपासून ते गणेशोत्सवातील पर्यावरणपूरक नियोजनापर्यंत अनेक विषयांवर भूमिका स्पष्ट केली. ‘जुलैअखेर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील’ शेतकरी कर्जमाफी आणि इतर निर्णयांच्या अंमलबजावणीबाबत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, कोणतीही मोठी शासकीय योजना राबवताना प्रशासकीय प्रक्रिया आणि पडताळणी आवश्यक असते. राज्यात असंख्य शेतकरी असल्याने त्यांचे मूल्यमापन आणि कागदपत्रांची तपासणी करण्यास वेळ लागतो. मात्र, सरकार वेगाने काम करत असून जुलैअखेरपर्यंत शेतकऱ्यांशी संबंधित बहुतांश प्रश्न मार्गी लागतील, असा मला पूर्ण विश्वास आहे. “शेतकरी समाधानी आहेत. माध्यमांनी प्रश्न विचारले तर उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत,” असेही त्यांनी सांगितले. कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार राज्यातील बदलत्या हवामानामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. अशा परिस्थितीत सरकारने घेतलेला कर्जमाफीचा निर्णय शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला. एक शेतकरी म्हणून मी त्यांचे मनापासून आभार मानते. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा हा प्रवाह पुढेही कायम राहील, असा आम्हाला विश्वास आहे,” असे त्यांनी सांगितले. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ निवडणुकीपुरतीच असल्याचा विरोधकांचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. त्या म्हणाल्या, “ही योजना महिलांच्या कल्याणासाठी आहे. लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेल्या प्रत्येक रुपयाची नोंद सरकारकडे आहे. त्यामुळे योजना बंद होणार असल्याचा प्रश्नच उद्भवत नाही.” लाभार्थींची पडताळणी सुरू असल्याचे स्पष्ट करत त्या म्हणाल्या की, करदात्यांचा पैसा योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. एकाच व्यक्तीने दोन किंवा तीन वेळा चुकीच्या पद्धतीने लाभ घेऊ नये म्हणून डुप्लिकेशन रोखण्याची प्रक्रिया सुरू आहे. महायुतीत खातेवाटपावरून वाद नाही राष्ट्रवादी काँग्रेसने अर्थखात्यावर दावा कायम ठेवल्याबाबत विचारले असता पंकजा मुंडे म्हणाल्या, “महायुतीमध्ये कोणते खाते कोणाकडे असावे, यावर आमच्यात कोणताही वाद किंवा मतभेद नाही. सरकारने सामान्य माणसासाठी काम करणे महत्त्वाचे आहे.” जयंत पाटील यांच्या भेटीवर सूचक प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेल्या भेटीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी कोणतीही राजकीय टिप्पणी करण्यास नकार दिला. “एखादा विरोधी पक्षाचा नेता किंवा आमदार एखाद्या मंत्र्याला किंवा मुख्यमंत्र्यांना भेटला म्हणून त्यातून राजकीय अर्थ काढता येत नाही. काय घडत आहे किंवा पुढे काय होईल, हे योग्य वेळी सर्वांनाच कळेल,” असे त्या म्हणाल्या. 65 टक्के पेरण्या पूर्ण; पावसाची प्रतीक्षा राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर बोलताना त्यांनी सांगितले की, आतापर्यंत सुमारे ६५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, अपेक्षित पाऊस अद्याप झालेला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. सरकार दर मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत पाणीस्थितीचा आढावा घेत असून सर्वप्रथम पिण्याच्या पाण्याला, त्यानंतर शेतीला आणि मग उद्योगांना प्राधान्य दिले जात आहे. आता लवकर चांगला पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नियोजन गणेशोत्सवातील पीओपी मूर्तींबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, पर्यावरणाचे संरक्षण आणि मूर्तिकारांचे हित या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन सरकारने मागील वर्षी प्रभावी नियोजन केले होते. कृत्रिम विसर्जन तलाव, मूर्तींच्या आकारानुसार स्वतंत्र व्यवस्था आणि पुनर्वापरावर भर देण्यात आला होता. यंदाही पर्यावरण विभाग त्याच पद्धतीने नियोजन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हेही वाचा… डिलिमिटेशन विधेयकावरून राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट:सुप्रिया सुळेंनी सर्व चर्चा फेटाळल्या; पत्रकार परिषदेत सांगितला 50 टक्के जागावाढीचा प्रस्ताव नेमका काय!
संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ‘मतदारसंघ पुनर्रचना’ (डिलिमिटेशन) विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये रंगल्या होत्या. मात्र, या सर्व चर्चा केवळ ‘सूत्रांच्या’ आधारे असून, पक्षाने अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका घेतलेली नाही, असा मोठा खुलासा पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या विधेयकामागचा इतिहास, अमित शहांचा प्रस्ताव आणि ‘इंडिया’ आघाडीची भूमिका यावर सविस्तर प्रकाश टाकला. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
महायुतीत खातेवाटपावरून वाद नाही:पंकजा मुंडेंनी मानले मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार, लाडकी बहीण योजनेबाबतही दिली मोठी माहिती