Headlines

महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई!:पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संपर्कात असलेल्यांवर राज्यभरात 150 ठिकाणी छापे




महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियाद्वारे कथित संपर्कात असलेल्या व्यक्तींविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. या संशयास्पद हालचालींच्या पार्श्वभूमीवर, एटीएसने मुंबई, ठाणे, कुर्ला, वांद्रे, जोगेश्वरी, नवी मुंबई, मीरा रोड, भाईंदर, सांगली, सातारा आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरातील 150 हून अधिक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे. या कारवाईमुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली असून, एटीएसच्या रडारवर 150 हून अधिक संशयित व्यक्ती असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या शोधमोहिमेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही, परंतु राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, तपास यंत्रणांकडून कसून चौकशी केली जात आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने बुधवारी शहजाद भट्टीशी संबंधित दोन संशयास्पद गट उद्ध्वस्त करत दिल्ली आणि पंजाबमधून सहा जणांना अटक केल्यानंतर, महाराष्ट्रात एटीएसने ही मोठी कारवाई सुरू केली आहे. तपासानुसार, अटकेतील संशयितांनी दिल्लीतील सिव्हिल लाइन्स, आनंद विहार बस टर्मिनल, रेल्वे स्थानके आणि गजबजलेल्या बाजारपेठांची रेकी करून त्यांचे व्हिडिओ एका प्रतिबंधित मेसेजिंग ॲपद्वारे भट्टीला पाठवले होते. या पार्श्वभूमीवर, सोशल मीडियाद्वारे भट्टीच्या संपर्कात असलेल्या महाराष्ट्रातील 150 हून अधिक व्यक्तींवर लक्ष केंद्रित करत ही व्यापक शोधमोहीम हाती घेण्यात आली असून, याबाबतचा अधिक तपास सुरू आहे. कोण आहे शहजाद भट्टी? पाकिस्तानातील लाहोरचा रहिवासी असलेला शहजाद भट्टी हा एकेकाळी ऑनलाइन कंटेंटच्या माध्यमातून सोशल मीडियावर लोकप्रिय झाला होता. मात्र, आता तो दुबईतून ‘डोगर गँग’ आणि इतर गुन्हेगारी टोळ्यांचे मोठे नेटवर्क चालवत असल्याचे उघडकीस आले आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा गैरवापर करून असुरक्षित भारतीय तरुणांना आपल्या जाळ्यात ओढणे, त्यांच्यात कट्टरतावादी विचारसरणी रुजवणे आणि त्यांना गुन्हेगारी तसेच दहशतवादी कारवायांशी जोडणे, असा अत्यंत गंभीर आरोप त्याच्यावर आहे. गेल्या काही महिन्यांत भारतातील दहशतवादी भरती आणि हेरगिरीच्या अनेक प्रकरणांमध्ये भट्टीचे नाव वारंवार समोर आल्याने तो भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या मुख्य रडारवर आला आहे. महाराष्ट्रातील काही तरुणही त्याच्याशी सोशल मीडियाद्वारे संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती मिळाल्यानंतर, राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने हे अतिरेकी नेटवर्क मुळासकट उद्ध्वस्त करण्यासाठी धडक कारवाई सुरू केली आहे. आता शहजाद भट्टीची उलटगणती सुरू झाली असून, त्याच्या कारवायांना आळा घालून त्याला जेरबंद करण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणांनी आपले प्रयत्न अधिक तीव्र केले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *