![]()
शिवसेना ठाकरे गटात पक्षांतर्गत फेरबदलांच्या हालचाली सुरू असून, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर लवकरच ‘कार्याध्यक्ष’ पदाची धुरा सोपवण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, या संभाव्य नेतृत्व बदलावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जोरदार टीका केली आहे. “केवळ माणसं बदलून पक्ष वाढत नसतो, तुम्ही विचारांना मुठमाती दिली म्हणूनच तुमच्यावर ही ‘मरणअवकळा’ आली आहे,” अशा बोचऱ्या शब्दांत दानवे यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले. गत काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. त्यातच जून महिन्यात होणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी राज्याच्या राजकारणात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया देत शिवसेना ठाकरे गटावर टीका केली आहे३ नेमके काय म्हणाले रावसाहेब दानवे? आदित्य ठाकरे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये केलेल्या कामाची दखल घेत त्यांना मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना रावसाहेब दानवे म्हणाले की, “पक्षात माणसं बदलून काहीही साध्य होणार नाही. बाळासाहेब ठाकरे होते तेव्हाचा पक्ष आणि उद्धव ठाकरे आल्यानंतरचा पक्ष यात मोठी तफावत आहे. तुम्ही मूळ विचारांना सोडून दिले आहे. विचार बदलला की संघटनेची काय अवस्था होते, हे सध्या महाराष्ट्रात दिसत आहे.” निवडणुकीच्या निकालावरून हाणला टोला रावसाहेब दानवे यांनी केवळ वैयक्तिक टीका न करता ठाकरे गटाच्या निवडणूक कामगिरीवरही बोट ठेवले. ते म्हणाले, “माणसे बदलल्याने पक्ष संघटना मजबूत होत नसते. जर तुमची संघटना इतकीच भक्कम आहे, तर तुमच्या किती नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा निवडून आल्या? याचे उत्तर आधी द्यायला हवे. माणसे तुमच्यासोबत टिकली पाहिजेत, पण तुम्ही विचारच बदलल्याने ही परिस्थिती ओढवली आहे.” आदित्य ठाकरेंच्या नव्या जबाबदारीची चर्चा का? गेल्या काही महिन्यांपासून आदित्य ठाकरे हे पक्ष संघटनेत अधिक सक्रिय झाले आहेत. निवडणुकीचे नियोजन, दौरे आणि तरुण मतदारांना साद घालण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचे पक्षातील नेत्यांचे मत आहे. त्यामुळे त्यांना पक्षात अधिकृतपणे ‘दुसऱ्या क्रमांकाचे’ स्थान म्हणजेच कार्याध्यक्षपद देऊन संघटनात्मक ताकद वाढवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून सुरू असल्याची चर्चा आहे. आदित्य ठाकरेंनी फेटाळली चर्चा दरम्यान, या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी बुधवारी दुपारी एका पोस्टद्वारे आपली कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यासंबंधी पक्षात कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे ठणकावून सांगितले. आज सकाळपासून काही टीव्ही चॅनेल्सवर बातमी आहे की, मला पक्षात काही पद दिलं जाणार आहे. ह्या बातमीत काहीही तथ्य नाही आणि अशी कुठलीही चर्चा पक्षात नाही. कृपया ह्याची सर्व माध्यमांनी नोंद घ्यावी, असे आदित्य ठाकरे प्रस्तुत बातमी फेटाळताना म्हणाले.
Source link
माणसे बदलल्याने पक्ष मजबूत होणार नाही:विचारांतील बदलामुळेच शिवसेनेवर मरणअवकळा, रावसाहेब दानवेंची आदित्य ठाकरेंवर टीका