Headlines

अंगावर शहारे आणणारे 'छत्रपती' गीत प्रेक्षकांच्या भेटीला:अजय-अतुलच्या संगीताने सजलेले 'राजा शिवाजी' चित्रपटाचे भव्य 'अँथम' प्रदर्शित




‘जिओ स्टुडिओज्’ आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ यांच्या संयुक्त विद्यमाने साकार होणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटाचे पहिले गाणे, राजा शिवाजी अँथम ‘छत्रपती’, आज अधिकृतरीत्या प्रदर्शित झाले आहे. भारतीय इतिहासाचा तेजस्वी वारसा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अतुलनीय पराक्रम आणि हिंदवी स्वराज्याचा स्वाभिमान यांना समर्पित असलेले हे गीत म्हणजे केवळ संगीत नसून शौर्य आणि अभिमानाचा एक भव्य संगम आहे. ‘देश म्युझिक’ आणि ‘वॉर्नर म्युझिक इंडिया’च्या माध्यमातून समोर आलेले हे गीत प्रेक्षकांना एका अद्वितीय आणि भावपूर्ण संगीतमय अनुभवाची प्रचिती करून देत असून, या गाण्याने शिवप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. प्रख्यात संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला अजय गोगावले यांच्या पहाडी आणि भावस्पर्शी आवाजाची लाभलेली जोड या गीताची भव्यता द्विगुणित करते. मराठीसह हिंदी भाषेतही साकारलेल्या या गीतातील हिंदी शब्दरचना नामवंत गीतकार मनोज मुंतशिर यांनी केली असून, तब्बल 80 गायकांच्या समूहाने गायलेले हे गीत श्रवणीय भव्यतेचा एक नवा उच्चांक गाठते. स्वराज्याच्या स्वाभिमानाची आणि सामूहिक चेतनेची प्रखर जाणीव करून देणारे हे ‘अँथम’ ऐकताना केवळ संगीताचाच नव्हे, तर इतिहासातील एका सुवर्णकाळाचा प्रत्यय येतो, जो श्रोत्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांप्रति असलेला आदर आणि प्रेम अधिकच गडद करतो. भव्य दृश्यरचना आणि भावनिक गाभा यांचा सुरेख संगम असलेले हे गीत केवळ प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे नसून अंतर्मनाला थेट स्पर्श करणारे आहे. प्रभावी शब्दरचना आणि दमदार तालाच्या जोरावर हे गीत श्रोत्यांच्या मनात स्वराज्याप्रती अभिमानाची प्रखर भावना जागवते. केवळ एका राजाच्या पराक्रमाचा गौरव न करता, स्वराज्याचा उदय, जनमाणसातील जागृती आणि सामूहिक अस्मितेची प्रेरणादायी गाथा या गाण्यातून अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. रेमो डिसूझाचे नृत्यदिग्दर्शक प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांनी या गीताचे नृत्यदिग्दर्शन केले असून, त्यांच्या कल्पक हालचालींमुळे गीतातील भावविश्व अधिक उठावदार झाले आहे. संगीत आणि दृश्यांचा हा अद्भूत मेळ प्रेक्षकांसाठी एक जिवंत, ऊर्जावान आणि प्रेरणादायी अनुभव ठरत आहे. गाण्याच्या प्रत्येक फ्रेममध्ये जाणवणारी प्रचंड ऊर्जा, एकता आणि गांभीर्य हे ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या भव्यतेची साक्ष देते, ज्यामुळे हे गीत केवळ एक सादरीकरण न राहता अस्मितेचा सोहळा बनले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *