![]()
माणूस मेल्यानंतर केल्या जाणाऱ्या कर्मकांडांना फाटा देण्यासाठी आणि समाजातील घट्ट बसलेल्या अंधश्रद्धेवर प्रहार करण्यासाठी नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावच्या सरपंचांनी एक धाडसी निर्णय घेतला आहे. सरपंच शरद आरगडे यांनी चक्क जिवंतपणीच स्वतःचे ‘पिंडदान’ आणि ‘दहाव्याचा’ विधी उरकला आहे. २१ एप्रिल रोजी पार पडलेल्या या आगळ्यावेगळ्या विधीची चर्चा आता संपूर्ण राज्यभरात रंगली आहे. हिंदू धर्मात व्यक्तीच्या निधनानंतर १० व्या दिवशी पिंडदान आणि उत्तरकार्य करण्याची प्रथा आहे. मात्र, “मेल्यानंतर कोणी काय केले हे पाहायला मी जिवंत असणार नाही, मग जे काही करायचे आहे ते माझ्या डोळ्यादेखत का नको?” असा तर्कसंगत विचार करून सरपंच शरद आरगडे यांनी हा निर्णय घेतला. नेवासा तालुक्यातील भेंडा येथील स्मशानभूमीत हा अनोखा विधी पार पडला. या विधीमध्ये त्यांच्या पत्नी आणि मुलानेही शास्त्रोक्त पद्धतीने सहभाग घेतला. विशेष म्हणजे, विधी सुरू असताना अनेक कावळ्यांनी पिंडाला स्पर्श केला, जे पाहून उपस्थित नागरिक अवाक झाले. सामाजिक समतेचा पुरस्कार करणाऱ्या शरद आरगडे यांनी यापूर्वी गावात ‘जातमुक्तीचा’ ठरावही मंजूर केला होता. आता त्यांनी स्वतःच्या कृतीतून कर्मकांडांमागील अनावश्यक खर्च आणि अंधश्रद्धेवर प्रहार केला आहे. मृत्यूनंतर नको, जिवंतपणी जपा या निर्णयाबाबत बोलताना शरद आरगडे म्हणाले की, “माणूस जिवंत असताना त्याच्या गरजांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. मात्र, निधनानंतर समाज काय म्हणेल, या भीतीने दशक्रिया आणि तेराव्यासाठी वारेमाप खर्च केला जातो. अशा विधींमुळेच आत्म्याला मोक्ष मिळतो, हा गैरसमज दूर करण्यासाठी मी जिवंतपणीच स्वतःचे पिंडदान केले आहे. हा खर्च टाळून तो समाजोपयोगी कामासाठी वापरता येऊ शकतो.” विधवा प्रथांना कायमची तिलांजली केवळ कर्मकांडांना फाटा देऊन शरद आरगडे थांबले नाहीत, तर त्यांनी स्त्री सन्मानासाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. आपल्या निधनानंतर पत्नीला विधवा म्हणून जगण्याची सक्ती केली जाऊ नये, यासाठी त्यांनी एक कायदेशीर प्रतिज्ञापत्र तयार केले आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केले आहे की, माझ्या निधनानंतर पत्नीने कुंकू पुसू नये, बांगड्या फोडू नयेत किंवा मंगळसूत्र उतरवू नये. कोणत्याही प्रकारच्या जाचक विधवा प्रथा तिच्यावर लादल्या जाऊ नयेत. सुतक पाळण्यासही बंदी शरद आरगडे यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाने कोणतेही ‘सुतक’ पाळू नये किंवा पारंपारिक धार्मिक विधी करू नयेत. सामाजिक परिवर्तनाची ही लाट केवळ भाषणातून नाही तर प्रत्यक्ष कृतीतून यावी, या उद्देशाने त्यांनी हे पाऊल उचलले आहे. सौंदाळा गावच्या या सरपंचांच्या ‘विद्रोही’ आणि ‘सुधारणावादी’ भूमिकेचे समाजातील पुरोगामी गटाकडून कौतुक होत आहे.
Source link
मेल्यावर कोणी काय केलं, हे बघायला मी नसणार:सरपंचाने जिवंतपणीच उरकला स्वतःचा दहावा, पिंडाला कावळाही शिवला