Headlines

मोशी कचरा डेपो दुर्घटना:आई-वडील गावात पापड विकायचे; मुलाने पुण्यात सुखाचा संसार थाटला, पण मोशीतील दुर्घटनेने सर्व काही संपवले




मोशी येथील कचरा डेपोच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत एका उच्चशिक्षित तरुण कर्मचाऱ्याला आपले प्राण गमवावे लागले आहेत. भावेश मोहन वाणी (वय ३३ वर्षे) असे या मृत तरुणाचे नाव आहे. भावेश हे रुपीनगर (निगडी) येथे राहत असून, ते मूळचे जळगाव जिल्ह्यातील शिरसोली गावचे रहिवासी होते. त्यांच्या या आकस्मिक जाण्याने वाणी कुटुंबाचा एकमेव आधार हरपला असून, शुक्रवारी (दि. १० जुलै) रुपीनगर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास मोशी कचरा डेपो येथील ‘अन्थोनी लारा रिन्युएबल एनर्जी’ कंपनीच्या प्रकल्पावर ही धक्कादायक दुर्घटना घडली. कचऱ्याचा एक प्रचंड मोठा ढिगारा थेट प्रशासकीय इमारतीवर कोसळला. दुर्दैवाची बाब म्हणजे, ज्या वेळी ही घटना घडली, तेव्हा भावेश हे इमारतीमधील कॅन्टीनमध्ये जेवण करत होते आणि त्याच वेळी ते ढिगाऱ्याखाली गाडले गेले. २० तासांनंतर ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने बचावकार्य सुरू केले. मात्र, कचऱ्याचा ढिगारा डोंगराएवढा मोठा असल्याने पहिल्या दिवशी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कोणाचाच शोध लागू शकला नाही. अखेर गुरुवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास (सुमारे २० तासांनंतर) भावेश यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले. त्यांना तातडीने यशवंतराव चव्हाण स्मृती (YCM) रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. पापड विकणाऱ्या आई-वडिलांचा एकमेव आधार हरपला भावेश यांची जीवनकहाणी अत्यंत संघर्षाची होती. त्यांचे वडील मोहन वाणी हे जळगावात (शिरसोली) पापड विकायचे आणि आई शालिनी घरी पापड लाटण्याचे काम करायची. आई-वडिलांनी अत्यंत गरिबीत काबाडकष्ट करून भावेशला उच्चशिक्षण दिले होते. पाच वर्षांपूर्वी भावेश पुण्यात ‘अकाउंटंट’ म्हणून नोकरीला लागले. दीड वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह मोहिनी यांच्याशी झाला होता. “आई-बाबा, तुम्ही आयुष्यभर खूप कष्ट काढलेत. आता माझ्यासोबत पुण्यात चला आणि इथे आराम करा,” असे सांगून भावेश यांनी आपल्या वृद्ध आई-वडिलांना नुकतेच पुण्यात बोलावून घेतले होते. कुटुंबाचा सुखी संसार आनंदाने सुरू असतानाच नियतीने त्यांच्यावर मोठा घाला घातला. वाणी कुटुंबावर नियतीचा दुसरा क्रूर प्रहार वाणी कुटुंबावर कोसळलेले हे दुःखाचे संकट पहिल्यांदाच आलेले नाही. साधारण १० वर्षांपूर्वी या कुटुंबाने आपल्या १५ वर्षांच्या मुलीला गमावले होते. मुलीच्या जाण्याच्या दुःखातून सावरत असतानाच, आता डोळ्यांदेखत एकुलत्या एक कमावत्या मुलाचाही मृत्यू झाल्याने या वृद्ध आई-वडिलांच्या जगण्याचा शेवटचा आशेचा किरणही मावळला आहे. आक्रोशाने उपस्थितांचे काळीज हेलावले भावेश यांच्या निधनाची बातमी समजताच आई-वडिलांना मोठा मानसिक धक्का बसला. अत्यंत जड अंतःकरणाने त्यांनी ही दुःखद बातमी भावेश यांच्या पत्नीला दिली. गुरुवारी शवविच्छेदन झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी ८:३० वाजता त्यांचे पार्थिव रुपीनगर येथील निवासस्थानी आणण्यात आले. भावेश यांचे पार्थिव दारात येताच त्यांच्या आई-वडिलांनी आणि पत्नी मोहिनी यांनी फोडलेला हंबरडा उपस्थित प्रत्येकाचे काळीज पिळवटून टाकणारा होता. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी मूळ गावाहून तब्बल ६० नातेवाईक आणि मित्र पुण्यात दाखल झाले होते. अश्रू भरलेल्या डोळ्यांनी आणि जड अंतःकरणाने सर्वांनी लाडक्या भावेशला अखेरचा निरोप दिला. हे ही वाचा… मोशी कचरा डेपो दुर्घटना:आतापर्यंत 16 जणांना बाहेर काढण्यात यश, 7 जणांचा शोध अद्याप सुरूच; आज एकाचा मृत्यू मोशी येथील कचरा डेपोत ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर ४५ मीटर उंच कचऱ्याचा डोंगर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेतील बचावकार्य सलग तिसऱ्या दिवशी युद्धपातळीवर सुरू आहे. ताज्या अपडेटनुसार, प्रशासनाला आतापर्यंत ढिगाऱ्याखालून १६ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र, बाहेर काढण्यात आलेल्या अक्षय सावंत या कामगाराचा पिंपरी येथील वायसीएम (YCM) रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अद्याप ७ कामगार बेपत्ता असून, त्यांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ (NDRF) आणि प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *