Headlines

सिद्धिविनायकचा मुद्दा चार वर्षांपूर्वीच आम्ही मांडला होता:सरकार राम मंदिरावरील लक्ष वळवण्याचा प्रयत्न करतंय, यशवंत किल्लेदारांचा हल्लाबोल




सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते यशवंत किल्लेदार यांनी राज्य सरकारवर आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. सिद्धिविनायक मंदिरातील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा आपण साडेतीन ते चार वर्षांपूर्वीच उपस्थित केला होता, असा दावा करत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच, राम मंदिरातील कथित गैरव्यवहारावरील लक्ष विचलित करण्यासाठीच हा जुना मुद्दा पुन्हा पुढे आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. किल्लेदार म्हणाले, “सरकार लोकशाही पद्धतीने काम करत नाही, तर हुकूमशाही पद्धतीने काम करत आहे. त्यामुळे भ्रष्टाचार सर्वत्र बोकाळला आहे. जनतेला सांगू इच्छितो की, हे लोक देवालाही सोडत नाहीत. राम मंदिरातील कथित गैरव्यवहारानंतर आता लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी साडेतीन-चार वर्षांपूर्वीचा सिद्धिविनायक मंदिराचा मुद्दा पुढे आणला जात आहे.” ‘तक्रार चार वर्षांपूर्वीच केली होती’ सिद्धिविनायक मंदिरातील कथित अनियमिततेबाबत आपणच सर्वप्रथम आवाज उठवला होता, असा दावा करत किल्लेदार म्हणाले, “त्या वेळी विधी व न्याय विभाग देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता. मी विधी व न्याय विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल केली होती. ते प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे आणि गैरव्यवहार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.” ‘सदा सरवणकर अध्यक्ष झाल्यानंतर मुद्दा पुन्हा चर्चेत’ किल्लेदार यांनी शिवसेना आमदार सदा सरवणकर यांचाही उल्लेख केला. “साडेतीन वर्षांपूर्वी सदा सरवणकर यांनीही मंदिराच्या विकासासाठी निधीची मागणी करत हा मुद्दा उपस्थित केला होता. आता ते सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष झाल्यानंतर हा विषय पुन्हा चर्चेत आणला जात आहे,” असा दावा त्यांनी केला. मात्र, संपूर्ण यंत्रणा सरकारच्या नियंत्रणाखाली असल्याने निष्पक्ष चौकशी होईल, अशी अपेक्षा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘खरे प्रश्न दडपण्यासाठी मुद्दे पुढे केले जात आहेत’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत सिद्धिविनायक मंदिरातील कथित गैरव्यवहाराचा उल्लेख केल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना किल्लेदार म्हणाले, “हे सर्व मुद्दे खऱ्या प्रश्नांवर पडदा टाकण्यासाठी पुढे केले जात आहेत. लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवणे, हीच त्यांची नेहमीची राजकीय शैली आहे.” शिंदेंनी दिले चौकशीचे संकेत दरम्यान, विधान परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसेच्या पत्रकार परिषदेचा दाखला देत सिद्धिविनायक मंदिरातील कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे सांगितले. “मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सिद्धिविनायक मंदिराबाबत केलेल्या आरोपांचा मी उल्लेख केला होता. जर तिथे काही गैरव्यवहार झाला असेल, तर त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत,” असे शिंदे म्हणाले. भ्रष्टाचाराबाबत बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ना मैं खाऊंगा, ना किसी को खाने दूंगा’ या भूमिकेची आठवण करून देत, “राम मंदिराच्या नावावर किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी भ्रष्टाचार झाला असेल, तर संबंधितांना तुरुंगात जावे लागेल. हा रामभक्तांच्या श्रद्धेचा विषय आहे,” असेही स्पष्ट केले. नरेश म्हस्केंचा संजय राऊतांवर पलटवार दुसरीकडे, शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. “सकाळी उठून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणे हा संजय राऊतांचा एकमेव उद्योग झाला आहे. विधान परिषदेत एकनाथ शिंदेंनी जे आरोप केले, ते मनसेने यापूर्वी केलेल्या दाव्यांच्या आधारे होते. त्यामुळे राऊतांनी वल्गना करण्याऐवजी या आरोपांवर स्पष्टीकरण द्यावे,” असा पलटवार म्हस्के यांनी केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *