![]()
मुंबई महापालिकेच्या महासभेत शुक्रवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मरिन ड्राईव्हवरील व्हायरल व्हिडिओवरून झालेल्या ट्रोलिंगला सभागृहातून सडेतोड उत्तर दिले, तर दुसरीकडे माजी महापौर तथा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनाच्या कारभारावर, पावसाळ्यातील दुर्घटनांवर आणि वाढत्या कंत्राटांवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आक्रमक भूमिका घेतली. ‘मी रीलस्टार की रिअलस्टार हे मुंबईकर ठरवतील’ मरिन ड्राईव्हवर भरतीच्या वेळी महापौर रितू तावडे या रील्स काढण्यासाठी गेल्याचा आरोप सोशल मीडियावर करण्यात आला होता. यावर सभागृहात बोलताना त्यांनी संताप व्यक्त केला. “मी रीलस्टार आहे की रिअलस्टार, हे मुंबईकर ठरवतील. तो अधिकार इतर कोणालाही नाही. आम्ही जबाबदारी झटकत नाही. पावसाळ्यात घडलेल्या ११ पैकी ११ घटनास्थळी मी स्वतः गेले. शताब्दी रुग्णालयात मध्यरात्रीही पोहोचले. तरीही माझ्यावर ट्रोलिंग करण्यात आले,” असे त्या म्हणाल्या. मरिन ड्राईव्हवर उतरण्याचे कारण स्पष्ट करताना रितू तावडे यांनी सांगितले की, भरतीच्या वेळी समुद्राच्या धोकादायक लाटा सुरू असतानाही अनेक लहान मुले आणि पर्यटक कट्ट्यावर बसले होते. त्यांच्या सुरक्षिततेसाठीच आपण तेथे गेलो होतो, रील्स काढण्यासाठी नव्हे, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘मी आधी कार्यकर्ता, नंतर महापौर’ आपल्या कामाच्या पद्धतीबाबत बोलताना रितू तावडे म्हणाल्या, “महापौर होण्यापूर्वी मी कार्यकर्ता होते आणि आजही माझ्यातला कार्यकर्ता जिवंत आहे. म्हणूनच संकटाच्या काळात मी कार्यालयात बसत नाही, तर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरते.” त्यांनी पावसाळ्यातील कामकाजाचा उल्लेख करताना मिलन सबवे, अंधेरी, मालाडसह अनेक पूरग्रस्त भागांना भेट दिल्याचे सांगितले. दोन धमक्या आल्या, तरी काम थांबवले नाही महापौरांनी सभागृहात पहिल्यांदाच उघड केले की, त्यांना दोन वेळा धमकीचे ई-मेल आले होते. मात्र, त्यानंतरही त्यांनी कोणतीही प्रसिद्धी न करता फिल्डवर जाऊन काम सुरू ठेवले. किशोरी पेडणेकरांवर अप्रत्यक्ष टीका महापौर रितू तावडे यांनी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. आपल्या कार्यालयात येऊन त्यांच्या पीएने कागदपत्रांचे फोटो आणि व्हिडिओ घेतल्याचा आरोप त्यांनी केला. “धमक्या येत असतानाही तुमचा पीए माझ्या दालनात येऊन रेकी करतो, कागदपत्रांचे फोटो काढतो. त्यामुळे मी चौकशीचे आदेश दिले आहेत. सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट मी करेन,” असा इशाराही त्यांनी दिला. त्याचवेळी प्रशासन चुकीचे असेल तर त्यांनाही खडे बोल सुनावण्याची ताकद आमच्यात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘महापालिकेचा अनुभव आम्ही वाया जाऊ देणार नाही’ दरम्यान, माजी महापौर आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी महासभेत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर घणाघाती हल्लाबोल केला. “गेली चार वर्षे महापालिकेत प्रशासक राजवट होती आणि त्याआधी पाच वर्षे भाजपचे अनेक नगरसेवक सभागृहात नव्हते. मात्र, आमचा नऊ वर्षांचा अनुभव आणि महापालिकेचा मान-सन्मान वाढवण्यासाठी केलेले काम आम्ही वाया जाऊ देणार नाही. सत्ताधाऱ्यांचे कान, नाक आणि डोळे आम्हीच आहोत. त्यामुळे प्रशासनाने आम्हाला उत्तरे द्यावीच लागतील,” असे त्या म्हणाल्या. आयुक्तांच्या अनुपस्थितीवर संताप महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू असताना महापालिका आयुक्त सभागृहात अनुपस्थित असल्याबद्दल किशोरी पेडणेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “१५ जूनलाच आम्ही पावसाळ्यापूर्वी पत्र दिले होते. त्याची दखल घेतली नाही. आज इतक्या संवेदनशील विषयावर चर्चा असताना आयुक्त अनुपस्थित राहणे म्हणजे सभागृहाचा अपमान आहे,” असे त्यांनी म्हटले. तसेच, “तुमच्याच उपमहापौरांनी आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मग सत्ताधारी म्हणून तुमची भूमिका काय? प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुगलबंदी सुरू आहे का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ‘९,८६० कोटी कंत्राटदारांच्या घशात’ मुंबईतील सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामांवरून किशोरी पेडणेकर यांनी गंभीर आरोप केले. “२०२२ नंतर फेज-१ आणि फेज-२ अंतर्गत तब्बल ९,८६० कोटी रुपयांची कंत्राटे देण्यात आली. कंत्राटदारांनी भरायचा जीएसटी पालिकेने का भरला? याची श्वेतपत्रिका काढावी,” अशी मागणी त्यांनी केली. सिमेंट काँक्रीटीकरणामुळे झाडांच्या मुळांना पाणी मिळत नसल्याने जुनी झाडे उन्मळून पडत असून त्यातून नागरिकांचे मृत्यू होत असल्याचा आरोप करत, “या मृत्यूला प्रशासन आणि कंत्राटदार जबाबदार आहेत,” असेही त्या म्हणाल्या. मृतांच्या कुटुंबीयांना मदत कुठे? पावसाळ्यात झाड पडून किंवा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याचा मुद्दाही किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला. “महापौरांनी १० लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली. मग ती रक्कम अजून लाभार्थ्यांच्या खात्यात का जमा झाली नाही?” असा सवाल त्यांनी केला. उघडे मॅनहोल आणि नागरिकांची सुरक्षा गेल्या चार वर्षांत प्रशासनाने शहरातील मॅनहोलवर सुरक्षाजाळ्या का बसवल्या नाहीत? असा प्रश्न उपस्थित करत किशोरी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. “आता नागरिकांनी रस्त्यावर चालताना खाली, वर, डावीकडे आणि उजवीकडे पाहत चालावे, अशी वेळ प्रशासनाने आणली आहे,” असा टोला त्यांनी लगावला. प्रभाग समित्यांच्या फेररचनेवरही प्रश्न के-नॉर्थ आणि के-साऊथ या प्रभाग समित्या एकत्र करण्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप करत, “ठाकरे गटाचा अध्यक्ष होऊ नये म्हणूनच हा निर्णय घेतला का?” असा सवाल त्यांनी सत्ताधाऱ्यांना केला. महासभेत महापौर रितू तावडे यांनी ट्रोलिंग, धमक्या आणि आपल्या कामकाजावर भूमिका स्पष्ट करत विरोधकांना प्रत्युत्तर दिले, तर किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनाच्या कारभारावर, कंत्राटांवर आणि पावसाळी व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या नव्या महासभेतील पहिल्याच बैठकीत सत्ताधारी आणि विरोधकांतील संघर्ष स्पष्टपणे समोर आला.
Source link
मुंबई मनपाच्या महासभेत महापौर-विरोधक आमनेसामने:ट्रोलिंग, धमक्या, पावसाळी दुर्घटना आणि प्रशासनाच्या कारभारावर जोरदार खडाजंगी