![]()
छत्रपती संभाजीनगर शहरात 90 च्या दशकात आपली मोठी दहशत निर्माण करणाऱ्या आणि गेल्याच महिन्यात निधन झालेल्या ‘डॉन’ बाबा फरजान याच्या मिटमिटा येथील आलिशान बंगल्यावर गुन्हे शाखेने भल्या पहाटे धाडसी छापा टाकला. अत्यंत गोपनीयतेने करण्यात आलेली ही कारवाई तब्बल 21 तास चालली. या छापासत्रात पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागले असून, दोन खोल्यांमध्ये सापडलेली कोट्यवधींची रोकड मोजण्यासाठी पोलिसांना 5 काउंटिंग मशिन्स मागवाव्या लागल्या. मिळालेल्या माहितीनुसार, मिटमिटा आणि सिटी चौक परिसरात एकेकाळी मोठा दबदबा असलेल्या बाबा फरजान याचे महिन्याभरापूर्वीच निधन झाले होते. त्यानंतर पोलिसांनी या कारवाईचे नियोजन अत्यंत गुप्त ठेवले होते. छापा टाकण्यापूर्वी पोलिसांनी डॉनच्या दोन अत्यंत विश्वासू कर्मचाऱ्यांना आधीच ताब्यात घेऊन चौकशी केली होती. त्यानंतर शुक्रवारी भल्या पहाटे 4 वाजेच्या सुमारास शहर पोलिस, गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या फौजेने पडेगाव-मिटमिटा परिसरातील सुमारे एक एकर परिसरात पसरलेल्या या आलिशान बंगल्याला वेढा घातला. 21 तासांच्या झडतीत काय काय आढळले? 5 कोटींची बेहिशोबी रोकड : 500 रुपयांच्या नोटांची बंडले मोजण्यासाठी 5 मशिन्स मागवण्यात आल्या होत्या. 29 लाखांचे दागिने : 21 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 8 लाख रुपयांची चांदी जप्त. घातक शस्त्रास्त्रांचा साठा : 4 रायफल, तब्बल 500 जिवंत काडतुसे, तलवारी आणि तीक्ष्ण चाकू हस्तगत. मध्यरात्री संपली कारवाई पहाटे सुरू झालेले हे छापासत्र मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास म्हणजेच तब्बल 21 तासांनी संपले. बंगल्यातील दोन गुप्त खोल्यांमध्ये ही बेहिशोबी रोकड, दागिने आणि घातक शस्त्रे लपवून ठेवण्यात आली होती. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनेही या मालमत्तेचा सखोल तपास सुरू केला असून, या सर्व घडामोडींचा अधिकृत तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. या संदर्भात पोलिस प्रशासन आज दुपारी पत्रकार परिषद घेणार असून, या ‘मेगा ऑपरेशन’ची संपूर्ण ‘इनसाईड स्टोरी’ समोर आणणार आहे.
Source link
90 च्या दशकातील 'डॉन' बाबा फरजानच्या बंगल्यावर गुन्हे शाखेचा छापा:21 तासांच्या छापासत्रात 5 कोटींची रोकड, सोन्या-चांदीसह शस्त्रास्त्रांचा साठा जप्त