Headlines

अयोध्या मंदिरावर टीका करणाऱ्यांनी रामरक्षा म्हणणं हा मोठा विनोद!:उद्धव ठाकरेंवर शिंदेंची बोचरी टीका, कर्जमाफीवर शरद पवारांनाही कौतुक असल्याचा दावा




उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शेतकरी कर्जमाफी, उद्धव ठाकरे, शरद पवार, शिवसेना संघटनबांधणी आणि विरोधकांच्या भूमिकेवर भाष्य केले. शेतकरी कर्जमाफीतील अटी हटवण्याचा निर्णय हा लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारा असल्याचे सांगतानाच उद्धव ठाकरे यांच्या प्रस्तावित ‘रामरक्षा’ पठणावर त्यांनी जोरदार टीका केली. शेतकरी कर्जमाफीबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, महायुती सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील उत्तरात कर्जमाफी योजनेतील अटी हटवण्याची घोषणा केली असून त्यामुळे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज असलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यावेळी शरद पवार यांनीही कर्जमाफीच्या निर्णयाचे कौतुक केल्याचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, “शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. चांगल्या निर्णयाला चांगले म्हणण्याची त्यांची वृत्ती आहे. मात्र काही विरोधी पक्षनेते सरकार कितीही चांगले काम करत असले तरी टीका करण्याचीच भूमिका घेतात. शरद पवारांनी त्यांना योग्य उत्तर दिले आहे.” उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल उद्धव ठाकरे पुढील आठवड्यात नागपुरात रामरक्षा पठण करणार असल्याच्या प्रश्नावर शिंदे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. “जनतेने शिक्षा केल्यानंतर त्यांना आता रामरक्षा आठवली. हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे,” असा टोला त्यांनी लगावला. “हिंदुत्व हे टी-शर्ट बदलावा तसे बदलता येत नाही. ते मनातून असावे लागते. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ज्यावेळी सोडले, त्याचवेळी त्यांचे हिंदुत्व संपले. अयोध्येतील राम मंदिरावर टीका करणाऱ्यांनी आता रामरक्षा म्हणणे हा मोठा विनोद आहे,” अशी टीका त्यांनी केली. तसेच, “ज्यांनी हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये टाकले, त्यांनी आता रामरक्षा म्हणण्याची भाषा करणे हे ढोंग आहे,” असेही शिंदे म्हणाले. सिद्धिविनायक प्रकरणावरही प्रतिक्रिया मनसे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या सिद्धिविनायक मंदिरातील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर बोलताना शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. “कोणताही विषय असो, चौकशी होणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. ‘मोदींची भूमिका स्पष्ट; भ्रष्टाचार करणारे जेलमध्ये जातील’ भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलताना शिंदे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका स्पष्ट आहे – ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा.’ चुकीचे काम करणाऱ्यांना जेलमध्ये जावे लागेल, असा कोट्यवधी रामभक्तांचा विश्वास आहे.” शिवसेनेत नव्यांना संधी देण्यामागे पक्षवाढीचे धोरण शिवसेनेत नव्याने येणाऱ्या नेत्यांना प्राधान्य दिले जात असल्याच्या प्रश्नावर शिंदे म्हणाले की, पक्षवाढीसाठी काही राजकीय समीकरणे जुळवावी लागतात. “पक्ष वाढला तर सर्व कार्यकर्त्यांना संधी मिळते. शिवसेना दिलेला शब्द पाळणारा आणि कमिटमेंटला जागणारा पक्ष आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर लोकांचा विश्वास असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत,” असे त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *