![]()
पुणे येथे क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी गणेशोत्सव, दहीहंडी, ईद आणि महापुरुषांच्या जयंतीच्या मिरवणुकांमधील कर्णकर्कश आवाजाचा त्रास टाळण्यासाठी प्लाझ्मा स्पीकर आणि लेझर लाईटवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली आहे. डीजेचा आवाज निर्धारित डेसिबल मर्यादेपेक्षा जास्त नसावा, याची प्रशासनाने कठोर अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी कर्णकर्कश आवाजावर बंदी घालण्याच्या भूमिकेचे खर्डेकर यांनी स्वागत केले. ते म्हणाले की, सण-उत्सवांमध्ये लोकांचे मन राखताना वृद्ध, लहान मुले आणि रुग्णांचाही विचार करणे महत्त्वाचे आहे. मोठ्या आवाजातील संगीत काही जणांना आवडत असले तरी, बहुसंख्य सामान्य नागरिकांना त्याचा त्रास होतो. अनेकांना यामुळे आजार देखील उद्भवत आहेत. यावर आक्षेप घेतल्यास सामाजिक दबावाला सामोरे जावे लागते, ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. सण-उत्सव उत्साहात साजरे व्हावेत, पण त्यातील गैरप्रकार टाळले पाहिजेत, अशी भूमिका खर्डेकर यांनी मांडली. गणेश आगमन-विसर्जन, ईदच्या मिरवणुका किंवा महापुरुषांच्या जयंतीच्या मिरवणुकांमध्ये कर्णकर्कश आवाज आणि अश्लील अंगविक्षेप यांना सणाचा अविभाज्य भाग मानू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. ध्वनिप्रदूषणविरोधी ही भूमिका सर्वधर्मीय सण आणि मिरवणुकांसाठी समान असावी. पोलीस प्रशासनाने कोणताही भेदभाव न करता नियमांची कठोर अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दहीहंडीच्या वेळीच प्रशासनाच्या भूमिकेची दिशा अधिक स्पष्ट होईल, असेही खर्डेकर यांनी सांगितले. गणेशोत्सव उत्साहात साजरा व्हावा, पण विवेकाची कास सोडू नये. तरुणाईला योग्य दिशा देण्याची जबाबदारी नेत्यांचीही आहे, असे आवाहन त्यांनी केले.
Source link
प्लाझ्मा स्पीकर, लेझर लाईटवर बंदीची मागणी:मिरवणुकांमधील कर्णकर्कश आवाजाचा त्रास टाळण्यासाठी कठोर अंमलबजावणीची अपेक्षा